राजकुमारांसारखे आता काही शोमॅन झालेत ः पवार विरोधी पक्षनेते अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
नायक वृत्तसेवा, नगर
गणेशोत्सव हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. पण याआधी नेतेमंडळी एकमेकांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. पण सध्या जावं लागतं… आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शोमॅन होते तसे काही शोमॅन आता झाले आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. दुपारी ते श्रीगोंद्यात मेळावा घेणार आहे. राष्ट्रवादीपासून दुरावलेले नेते बाळासाहेब नहाटा आज पुन्हा राष्ट्रवादीचं घड्याळ दादांच्या उपस्थितीत आपल्या मनगटावर बांधतील. तत्पूर्वी आज सकाळीच अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून सद्यस्थितीतल्या राजकीय मुद्द्यांवरुन फटकेबाजी केली. नेत्यांचं गणपती दर्शन, दसरा मेळावा, ठाकरे विरुद्ध शिंदे या वादावर त्यांनी आपल्या स्टाईलने भाष्य केलं.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्षे महाराष्ट्रातील जनता पाहत होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेनेचं नेतृत्व यापुढे उद्धव ठाकरे करतील. मात्र सध्या ज्या काही राजकीय घडामोडी घडल्यात ते सगळ्यांनीच पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते, ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची? असं अजित पवार म्हणाले.
अशोकराव फुटणार नाहीत!
काँग्रेसचे आमदार फुटणार याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले की काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याशी त्यांची राजकीय भेट झालेली नाही. सध्या मीडिया काही बातम्या देत असते, ज्यात कोणतंही तथ्य नसतं, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या बातम्यांचं खापर दादांनी मीडियावर फोडलं.