ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्याचा लौकिक वाढवला ः थोरात खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणार्या स्पर्धकांचा गौरव सोहळा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते, फक्त ती ओळखून त्यांना योग्यवेळी संधी देण्याची आवश्यकता आहे. अशी संधी मिळाल्यास काय घडते याचे मूर्तीमंत उदाहरण ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उभे केले आहे. खेलो इंडिया स्पर्धेत शाळेच्या मुलांनी योगासनांची कमाल दाखवतांना संगमनेरचा लौकीक वाढवण्याचे काम केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत मिळालेल्या मोठ्या यशामुळे धु्रव ग्लोबलचे स्कूलचे नाव देशभरात पोहोचल्याचे गौरवोद्गार आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
हरयाणातील पंचकुला येथे पार पडलेल्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी घवघवीत यश मिळवताना सात सुवर्णपदकांसह एकूण बारा पदकं मिळविली. त्याबद्दल या सर्व यशस्वी स्पर्धकांचा ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आमदार थोरात यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार डॉ. सुधीर तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख राजेश मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे आदी उपस्थित होते.
या गौरव समारंभात पुढे बोलताना थोरात म्हणाले, की ध्रुव ग्लोबल स्कूलच्या या यशामागे विद्यार्थी व त्यांच्या प्रशिक्षकांचे परिश्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरी आहे. ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकांवर जसे काही देशांचे वर्चस्व असते, तसेच वर्चस्व राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत ध्रुव ग्लोबलने निर्माण केले आहे. त्यातून महाराष्ट्राचा आणि संगमनेरचा गौरव वाढला आहे. खरेतर कल्पकतेने शाळा चालवणे अत्यंत अवघड काम असल्याचे सांगताना थोरात म्हणाले की इतकी मोठी गुंतवणूक अन्य कोणत्या व्यवसायात केली असता तर आत्तापर्यंत त्याचे दहापट झाले असते. मात्र तसा विचार न करता डॉ. संजय मालपाणी यांनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे आणि आपला देश सामर्थ्यशाली व्हावा या संकल्पनेतून ही शाळा सुरू केली आहे. गेल्या दहा वर्षात या शाळेने मोठा लौकिक मिळविल्याने पालकांच्या मागणीवर पुण्यातही शाळा सुरू झाली आहे. तेथेही मोठा प्रतिसाद मिळाल्याने आता प्रवेशासाठी आम्हांला फोन येवू लागल्याची टिपण्णी थोरात यांनी यावेळी केली. आमदार डॉ. तांबे यांनी खेलो इंडिया स्पर्धेत यश मिळविणार्या विद्यार्थी व प्रशिक्षकांचे कौतुक करताना ध्रुवच्या विद्यार्थ्यांनी चमत्कारच घडविल्याचे सांगितले. मुलांमधील नेमके गुण हेरुन त्या क्षेत्रात त्यांना पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करणारे शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी गुणग्राहक असल्याचे सांगत सोळा वर्षांच्या अखंड परिश्रमातून त्यांनी ध्रुव ग्लोबलला शिक्षण क्षेत्रातला ब्रँड बनविल्याचे ते म्हणाले. या राष्ट्रीय स्पर्धेत केवळ पदकं प्राप्त न करता स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या 85 आसनांचा शोध लावण्याचे व त्यांना समर्पक नावे देण्याचे काम करुन ध्रुव ग्लोबलने देशपातळीवर आपली कीर्ती निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्तविकात डॉ. संजय मालपाणी यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने मुलांनी आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी घेतलेले परिश्रम विशद् केले. खेलो इंडिया स्पर्धेत सलग तीन वेळा विजेत्या ठरलेल्या महाराष्ट्राला यावेळी मात्र उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. परंतु, योगासनांमध्ये राज्याचे नेतृत्त्व करणार्या ध्रुव ग्लोबलच्या योगासनपटूंनी सहा सुवर्ण, चार रौप्य आणि एका कांस्यपदकासह गोवा संघाला एक सुवर्णपदक मिळवून देत योगासनांमध्ये महाराष्ट्राचा दबदबा कायम केल्याचे ते म्हणाले. योगासनांचा अभ्यासक्रम असो, अथवा या प्रकाराचा खेळांमध्ये समावेश झाल्याची आयुष आणि क्रीडा मंत्रालयाची उद्घोषणा असो या सगळ्यांमध्ये ध्रुव ग्लोबलच्याच योगासनपटूंची छायाचित्रे आणि छायाचित्रण वापरले जाणे ही आपल्या सर्वांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी खेलो इंडिया स्पर्धेत घवघवीत यश मिळवणार्या सर्व स्पर्धकांचा व मंगेश खोपकर, स्वप्नील जाधव, प्रवीण पाटील आणि किरण वाडेकर या प्रशिक्षकांचा आमदार थोरात व आमदार डॉ. तांबे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीला बन्सल व अंजली जाधव यांनी तर आभार गिरीश मालपाणी यांनी मानले. या कार्यक्रमाला ध्रुव ग्लोबलच्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.