नाशिक जिल्ह्यातील तडीपार गुंडाचा पेमगिरीच्या सरपंचावर हल्ला! घातक शस्त्रांचा वापर करीत वचपा काढला; ग्रामस्थांकडून पेमगिरी बंदची हाक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेल्या सराईत गुंडाकडून पेमगिरीच्या सरपंचावर घातक शस्त्राने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. याप्रकरणी जखमी असलेल्या सरपंचाच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी सराईत तडीपार गुंड पंकज सोनवणे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मागील एका प्रकरणात आरोपीने चोरी केल्याच्या कारणावरुन त्याला सरपंचासह गावातील काहींनी मारहाण केली होती, आरोपीने रविवारी त्याचाच वचपा काढल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पेमगिरीच्या ग्रामस्थांनी आज (ता.४) गावबंदची हाक दिली असून सकाळपासून संपूर्ण पेमगिरीत अतइआवश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळला जात आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.३) दुपारी पावणेपाचच्या सुमारास नवीन नगर रोडवरील भूमी अभिलेख कार्यालयाच्या समोर घडली. पेमगिरीचे सरपंच ज्ञानेश्वर पंढरीनाथ डुबे (वय ४३) काही कामानिमित्त संगमनेरात आले असता त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या आरोपींनी त्यांना वरील ठिकाणी गाठले. यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या पाच जणांनी सरपंच डुबे यांना अडवले. यावेळी नाशिक जिल्ह्यातून तडीपार असलेला गुंड पंकज सोनवणे व अन्य अनोळखी तीन इसमांनी खाली उतरुन फिर्यादी सरपंचाला घेरले.

यावेळी आरोपी सोनवणे याने चाकूचा धाक दाखवित ‘तू माझ्या बहिणीला का छेडतोस?’ असा सवाल करीत दमबाजी करण्यास सुरुवात केली. तर त्याच्या सोबत असलेल्या अन्य तिघा अज्ञात आरोपींनी आपल्या हातातील लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या तिघांनी सरपंच डुबे यांच्या डोक्यात, पाठीवर, उजव्या डोळ्याखाली तोंडावर व डाव्या हातावर रॉडने मारहाण केल्याने जखमी होवून ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपी सोनवणे याने आपल्या हातातील चाकूने त्यांच्या डोक्यात वार करुन त्यांना रक्तबंबाळ केले. हा प्रकार सुरु असताना तेथे मोठी गर्दी जमा झाल्याने काही वेळाने आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले.


त्यानंतर जमलेल्या नागरिकांनीच जखमी झालेल्या सरपंच ज्ञानेश्वर डुबे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी जखमीचा जवाब नोंदविला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी गणेश गडकरी, पंकज सोनवणे व अन्य अज्ञात तिघांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२६, ३२४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी यांच्याकडे सोपविला आहे. या घटनेनंतर पेमगिरीत तणावाचे वातावरण तयार झाले असून आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज (ता.४) गावबंदची हाक देण्यात आली असून सकाळपासूनच पेमगिरीतील सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत.

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पंकज सोनवणे हा अतिशय सराईत असलेला गुन्हेगार असून त्याच्यावर नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका प्रेमीयुगुलाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बोट्याजवळ आढळून आले होते. त्या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांना ऑनर किलिंगचा संशय होता. मात्र तपासात भलतीच माहिती समोर येवून घरातून पळून आलेल्या एका जोडप्याने नाशिकमध्ये घर घेण्यासाठी आरोपी सोनवणे याला काही लाखांची रक्कम देवूनही त्याने त्यांना घर न दिल्याचे व त्यानंतर पुण्यातही त्याच जोडप्याकडून त्याने पुन्हा दीड लाख रुपये उकळल्याचे समोर आले.

त्या घटनेच्या तपासातूनच एक-एक धागा उलगडत गेला आणि अखेर त्या जोडप्याला पैशांच्या बदल्यात घर देण्याच्या बहाण्याने पुण्याहून नाशिककडे घेवून जात असतांना आरोपीने बोट्याजवळ त्या तरुण जोडप्याचा खून करुन त्यांचे मृतदेह झुडूपात नेवून पेटवून दिले होते. त्या प्रकरणात सध्या तो जामीनावर बाहेर असून नाशिक जिल्ह्यातूनही तडीपार असल्याने सध्या पेमगिरीत वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी पेमगिरीतून अत्याचाराचाही एक प्रकार समोर आला होता. त्या प्रकरणातील आरोपीला साथ देण्यासाठी पंकज सोनवणे याने शेजारील एका गावात असलेले कृषी सेवा केंद्र फोडून मालाची चोरी केली होती.


सदरील चोरीचा माल त्याने पेमगिरीतील एका कृषी सेवा केंद्राला विकण्याचा प्रयत्न केला. त्यातून संशय बळावल्याने संबंधित दुकानदाराने चोरी झालेल्या दुकानदाराला सदरील प्रकार कळविल्यानंतर पेमगिरीचे सरपंच ज्ञानेश्वर डुबे व अन्य काहींनी आरोपी सोनवणेला मारहाण करुन तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावेळीच आरोपीने ‘सुटून आल्यानंतर तुझा काटा काढील’ असा सज्जड दम चक्क पोलिसांसमोरच भरला होता. रविवारी घडलेला प्रकार त्यातूनच घडला असून आरोपी सोनवणे याने ‘त्यावेळी’ दिलेली धमकी रविवारी वास्तवात उतरवली आणि सरपंचांना गाठून त्यांना घातक शस्त्रांचा वापर करुन जीवघेणी मारहाण केली.


सराईत म्हणून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपी पंकज सोनवणे याच्या विरोधात संगमनेर घारगाव पोलीस ठाण्यातही खून, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न व अन्य विविध कारणांनी गुन्हे दाखल आहेत. गेल्यावेळी त्याने पोलिसांच्या तावडीत असतानाही सरपंच ज्ञानेश्वर डुबे यांना धमकी दिली होती, ती त्याने रविवारी खरी करुन दाखवली. आता त्या सर्व आरोपींना गजाआड करण्याचे मोठे आव्हान संगमनेर शहर पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *