संगमनेर फेस्टिव्हलमधून संगमनेरच्या परंपरेचे जतन ः तांबे संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्या दिवशी उलगडला भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्ण इतिहास
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु असलेला संगमनेर फेस्टिव्हल म्हणजे संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासाचे प्रतिबिंब आहे. दरवर्षी गणेशोत्सवातील सहा दिवस वेगवेगळ्या दर्जेदार मनोरंजन कार्यक्रमांची मेजवाणी याद्वारे आपणास मिळते. राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने संगमनेर फेस्टिव्हलच्या माध्यमातून संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन केले आहे. हा महोत्सव आज महाराष्ट्रात गाजला असून उत्तरोत्तर त्याची उंची अशीच वाढत राहील असा विश्वास माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी व्यक्त केला.
संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण इतिहासाचा प्रवास उलगडणार्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ हा सुरेल गीतांचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रारंभी त्या बोलत होत्या. यावेळी फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनिष मालपाणी, कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी, खजिनदार उमेश कासट आदी उपस्थित होते.
सन 1912 साली भारतीय चित्रपटसृष्टीने जन्म घेतला तेथपासून स्वातंत्र्यापर्यंतच्या मुघले आझम या चित्रपटांच्या निर्मितीचा इतिहास उलगडणार्या या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. ओळखीचा पांढरा आणि अनोळखी काळा रंग यांच्या मिश्रणातून 18 मे 1912 साली दादासाहेब तोरणे यांनी पुंडलिक या मूकपटाची निर्मिती केली. मात्र हा मूकपट बनविणारी निर्माती कंपनी ब्रिटीश होती. त्यानंतर वर्षभराने 3 मे 1913 साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला चित्रपट तयार केला आणि येथूनच भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ सुरु झाला.
आपल्या बहारदार निवेदनातून राहुल सोलापूरकर यांनी त्यावेळी घडलेले विविध प्रसंग, घडामोडी, चित्रपटातील नायक आणि नायिकांची ओळख करुन दिली. त्याकाळी तयार होणार्या चित्रपटांच्या कथा पौराणिक, धार्मिक व ऐतिहासिक असत. जसजसा काळ बदलत गेला, तसतसे चित्रपटाच्या निर्मितीमध्येही बदल घडत गेले. त्या काळात तयार झालेल्या विविध चित्रपटांचा इतिहास उलगडतांना पडद्यावर त्याचे प्रतिबिंब दाखवले जाते होते, तर सुरेल गीताला नृत्याचीही जोड देण्यात आली होती. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमांना संगमनेरकरांना मंत्रमुग्ध केले.