अवैध फ्लेक्स आणि कमानी मुक्त संगमनेर घडवू या!
प्रशासनाला पत्र लिहीत आ.सत्यजित तांबे यांची भावनिक साद

संगमनेर : चंद्रकांत शिंदे पाटील
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात आणि तालुक्यात अवैध फ्लेक्स, झेंडे, कमानी आणि पोस्टरचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे सुसंस्कृत संगमनेर शहराचा चेहरामोहरा विद्रूप झाला असून फ्लेक्स, कमानींमुळे शहराचे सौंदर्य, संस्कृती आणि शिस्त या सर्वांचा गळा घोटला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत प्रशासनाचे लक्ष वेधत अवैद्य फ्लेक्स आणि कमानी मुक्त संगमनेर घडवण्याची साद घातली आहे.

आ. सत्यजित तांबे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना हे पत्र लिहिले.मी आज आमदार किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर एक संगमनेरकर म्हणून बोलतो आहे,असं सांगत आ. सत्यजित तांबे यांनी शहरातील वाढत्या अवैध फ्लेक्सच्या प्रदूषणावर भावनिक पद्धतीने नाराजी व्यक्त केली. या तक्रारीतील दोषी मी स्वतः आहे, असं स्पष्ट सांगत त्यांनी स्वतःपासून स्वच्छतेची मोहिम सुरू करण्याची घोषणा केली आहे.आ.तांबे म्हणाले, गेल्या काही दिवसांत संगमनेर शहरात आणि तालुक्यात अवैध फ्लेक्स, झेंडे, कमानी आणि पोस्टरचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. शहराचा दर्शनी भाग, चौक, रस्ते, बसस्थानक, अगदी मंदिरे आणि धार्मिक स्थळांचे सौंदर्यसुद्धा या फ्लेक्सने झाकोळून टाकले आहे. परिणामी शहराची ओळखच हरवते आहे.यावेळी त्यांनी राजकीय स्पर्धेतील अपरिहार्यताही मांडली. मी कोणाला दोष देत नाही. राजकीय आयुष्यातील स्पर्धेमुळे अनेकदा नाईलाजाने आम्हालाही मोठमोठे फ्लेक्स लावावे लागतात. पण ते करतांना मनाला आनंद होत नाही, उलट वेदना होतात, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

शहराची परंपरा आणि विकासाचा उल्लेख करतांना आ. तांबे म्हणाले, सन १९९१ मध्ये माझे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराला आधुनिकतेचा पाया दिला. माझी आई दुर्गा तांबे यांनी स्वच्छ आणि सुंदर संगमनेरसाठी आटोकाट प्रयत्न केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शहराला पाण्याची सुविधा, व्यापारवृद्धी आणि रस्त्यांची सोय उपलब्ध करून दिली. या सगळ्या प्रयत्नांनी संगमनेर आज जिथे आहे, तिथे पोहोचलं आहे. पण आज हेच शहर अवैध फ्लेक्समुळे विद्रूप होताना पाहून मन हेलावलं आहे.

आ.तांबे यांनी पुढे सांगितले की, अतिप्रमाणात फ्लेक्स आणि कमानीमुळे शहरात गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे राजकीय तणाव, वाद, फ्लेक्स फाडण्याचे प्रकार सुरू झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. संगमनेरचं सुसंस्कृत वातावरण बिघडत आहे. हे विद्रुपीकरण आता थांबायलाच हवं, असे सांगत ते म्हणाले,
याची सुरुवात मी स्वतःपासून करतो, असं जाहीर करत तांबे म्हणाले, माझे सर्व अवैध फ्लेक्स मी स्वतः तात्काळ काढून टाकणार आहे. एखादा फ्लेक्स राहिला असेल, तर प्रशासनाने बिनधास्त तो काढावा, मला आनंदच होईल.
प्रशासनाला त्यांनी ठाम सूचना केली की, शहरात फ्लेक्स, झेंडे, पोस्टर लावण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. त्या ठिकाणीच परवानगीने फ्लेक्स लावता येतील, अन्यथा गुन्हे दाखल करा. अशी शिस्त आणि आचारसंहिता लागू झाली तर मी आणि माझ्यासारखे सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते, व्यापारी आणि नागरिक ती निश्चित पाळतील असे सांगत त्यांनी शहरातील शांतता आणि सुसंस्कृत वातावरण टिकवण्यासाठी सर्व संगमनेरकरांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता नगरपरिषद आणि प्रशासन या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी आज आमदार किंवा राजकीय कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर एक संगमनेरकर म्हणून बोलतो आहे.या तक्रारीतील दोषी मी स्वतः आहे, पण आता बदलाची सुरुवात मीच करणार.गेल्या काही दिवसांत संगमनेर शहरात अवैध फ्लेक्स, झेंडे, कमानी आणि पोस्टरचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. शहराचं सौंदर्य हरवत आहे.राजकीय स्पर्धेमुळे आम्हालाही फ्लेक्स लावावे लागतात, पण ते करताना आनंद होत नाही, उलट वेदना होतात असे असेही आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

संगमनेर शहर फ्लेक्स व अवाढव्य कमानींच्या विळख्यात!
रहदारीला होतोय अडथळा; संबंधितांचे दुर्लक्ष या मथळ्याखाली ‘दैनिक नायक’ ने शुक्रवार दि.१२ सप्टेंबर रोजी शहरात बोकाळलेल्या फ्लेक्स बाजीवर व जुन्या नाशिक-पुणे महामार्गावरील कमानींवर संताप व्यक्त करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते.संगमनेर शहर स्वच्छ, सुटसुटीत व सुरक्षित राहण्यासाठी फ्लेक्स, बॅनर व अवाढाव्य कमानींना आळा घालणे ही काळाची गरज आहे. याबाबत आ.तांबे यांनी पुढाकार घेत स्वतःपासून याची सुरुवात केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

Visits: 22 Today: 3 Total: 1100144
