संगमनेर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात अव्वल! 55 हजार मतदारांची आधारशी जोडणी; सायखिंडी झाली शंभर टक्के लिंक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकसभेत मंजूर केलेल्या निवडणूक कायदा (सुधारणा) विधेयकानुसार 1 ऑगस्टपासून देशभरातील मतदारांचे ओळखपत्र आधारकार्डशी संलग्न करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघातही मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांच्या (बीएलओ) मदतीने या मोहिमेला सुरुवात झाली असून त्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेतंर्गत सायखिंडी येथील शंभर टक्के मतदारांची निवडणूक ओळखपत्रे आधारशी संलग्न झाली असून आत्तापर्यंत तालुक्यातील 55 हजार मतदारांची नावे आधारशी जोडली गेली आहेत. या मोहिमेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने एकूण मतदारांच्या 16 टक्के जोडणीसह संगमनेर तालुका जिल्ह्यात अव्वलस्थानी पोहोचल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने डिसेंबर 2021 मध्ये निवडणूक कायदा (सुधारणा) विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर केले होते. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरु करण्यात आली आहे. तत्पूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी अधिकार्यांसह विविध शासकीय विभागांचे कर्मचारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांची (बीएलओ) बैठक घेवून या मोहिमेचे महत्त्व आणि ती प्रभावाने राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.

मतदार ओळखपत्र आधारशी संलग्न करण्याच्या या देशव्यापी मोहिमेची संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल निकम व नायब तहसीलदार विनोद गिरी यांची निवड करण्यात आली. स्थानिक प्रशासनाने नियुक्त केलेले केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जावून मतदारांचे प्रबोधन करुन त्यांची मतदार यादीतील नावे आधारशी संलग्न करीत असून 1 ऑगस्टपासून सुरु असलेल्या या मोहिमेत संगमनेर विधानसभा मतदारसंघाने जिल्ह्यात आघाडी घेत आत्तापर्यंत 55 हजारहून (16 टक्के) अधिक मतदारांची नावे संलग्न करण्यात आली आहेत.

सायखिंडी मतदार केंद्राची जबाबदारी असलेल्या रवींद्र वर्पे या केंद्रस्तरीय मतदान अधिकार्याने गेल्या 15 दिवसांतच आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मतदारांची नावे आधारशी संलग्न केली आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या मोहिमेतंर्गत केंद्रस्तरीय मतदान अधिकार्यांच्या मदतीसोबतच कोणत्याही भारतीय मतदाराला आपल्या स्मार्टफोनचा वापर करुन ही जोडणी करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जावून अथवा गुगल प्ले-स्टोअर्समधून अॅप्लिकेशन डाऊनलोड करुनही त्याद्वारे आपले नाव संलग्न करता येईल. या मोहिमेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन नायब तहसीलदार (निवडणूक) विनोद गिरी यांनी केले आहे.
