‘शांतीदूत’ सूर्यकांत ओहरा आपल्यातून गेल्याचे दुःख ः पिचड
![]()
नायक वृत्तसेवा, अकोले
राजूर परिसरातील मीतभाषिक, इतरांचे दुःख समजून त्याला मदत करणारा ‘शांतीदूत’ आपल्यातून गेल्याचे दुःख होत असून बोटावर मोजण्याइतकी माणसे असतात. त्यापैकी सूर्यकांत उर्फ गटूभाऊ ओहरा होते, अशा भावना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केल्या.

अकोले तालुक्यातील राजूर येथील प्रतिथयश व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत बाबुलाल ओहरा यांचे वयाच्या 81 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. नुकतेच त्यांच्या घरी जाऊन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कुटुंबाचे सांत्वन केले. माजी मंत्री पिचड हे महाविद्यालय संपल्यानंतर राजूरला आले. त्यावेळी गटूशेठ यांच्या दुकानात येत असत. त्यावेळी सुंदरलाल शहा, जगन्नाथ पाबळकर, सुंदरलाल ओहरा, मनिकलाल मेहता यांच्या गप्पा रंगत. त्यानंतरच्या काळात पिचड राजकारणात आले. सभापती झाले, आमदार झाले, मंत्री झाले मात्र त्यांनी मैत्रीची नाळ तोडली नाही. पिचड साहेब हाच आमचा पक्ष असे म्हणत त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत गटूभाऊ मदतीसाठी तयार असायचे. मात्र स्वतः राजकारणात गेले नाही. किराणा, कापड दुकान चालवून तीन भाऊ एकदिलाने राहिले. एकमेकांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी धावून आले. बाळूशेठ, शशीकांत यांनी त्यांना वडिलांच्या ठिकाणी मानले. मारवाडी समाजाचे विश्वस्त असताना त्यांनी सुंदर मंदिराची स्थापना केली. विशेष म्हणजे आदिवासी भागातील लोकांचे ते आधारवड होते. माझ्या समाजकारणात, राजकारणात त्यांनी मला सतत साथ दिली. माझ्या कुटुंबातील ते एक घटक असल्याचे सांगत माजी मंत्री पिचड यांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
