सार्वजनिक गणेश मंडळांना ‘ऑनलाईन’ परवानगी! परवानगी घेणे आवश्यक; संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांच्या कोरोना प्रतिबंधानंतर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांशिवाय पार पडणार आहे. त्यासाठी राज्यभरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी सुरु झाली असून तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे. यावर्षी उत्सवांवरील सर्व बंधने हटविल्यानंतर सार्वजनिक मंडळांना पोलिसांची परवानगी मिळवण्यासाठी अडचणी येवू नयेत यासाठी राज्य सरकारने ‘ऑनलाईन’ परवानगीचे धोरण स्वीकारले असून श्रींची स्थापना करणार्या सर्व सार्वजनिक मंडळांनी महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर जावून नोंदणी करुन त्याची छापील प्रत शहर पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे.
संगमनेर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाला मोठी पंरपरा लाभली आहे. पुण्यात सन 1894 साली या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाल्यानंतर त्याच्या दुसर्याच वर्षी सन 1895 साली रंगारगल्लीतील सोमेश्वर मंदिरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या उपस्थितीत श्रींची स्थापना करुन संगमनेरात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हापासून आजतागायत संगमनेर तालुक्यात हा उत्सव दरवर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. एकट्या संगमनेर शहरात जवळपास शंभरावर मोठी सार्वजनिक गणेश मंडहे असून तितक्याच संख्येने बाल गणेश मंडळांची संख्या आहे.
सन 2020 मध्ये जगभरासह देशातही कोरोना महामारीने थैमान घातल्याने केंद्र व राज्य सरकारने सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले होते. त्यामुळे गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली साजर्या झालेल्या या उत्सवांना सार्वजनिक स्वरुप प्राप्त झाले नव्हते. मात्र यंदा कोरोनाचे संकट नाहीसे झाल्याने राज्य सरकारने सण-उत्सवांवरील सर्वप्रकारचे निर्बंध हटवून सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे तरुणाईला जोष चढला असून ठिकठिकाणी गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
सार्वजनिक स्वरुपातील कोणत्याही उत्सवासाठी स्थानिक पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी यापूर्वी त्या-त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात लिखीत स्वरुपातील अर्ज द्यावे लागत. यंदा मात्र ही पद्धत बदलण्यात आली असून राज्यात सर्वत्र केवळ ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाद्वारेच गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार असून त्यासाठी सार्वजनिक मंडळांना महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर जावून विहित नमुन्यातील अर्ज भरण्यासह संलग्न विभागाकडून घेण्यात आलेल्या परवानग्याही त्याला जोडव्या लागणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची एक प्रत छापून ती स्थानिक पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आजच संकेतस्थळावर जावून नोंदणी करावी असे आवाहन शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.