साईभक्ताला 40 रुपयांचे उद पॅकेट 7 हजारांना विकले फसवणूक करणार्या भामट्याविरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, शिर्डी
आग्रा येथून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकाची दिशाभूल करून एका भामट्याने 40 रुपयांची उद पॅकेट चक्क 7 हजार रुपयांना विकून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 1 ते 2 रुपयांना मिळणारं उदीचं पॅकेट 175 रुपयांचं सांगून एका मध्यमवर्गीय व्यक्तीची फसवणूक करण्यात आली आहे.

आग्रा येथील एका सामान्य कुटुंबातील आणि हॉटेलमध्ये 10 हजार रुपये महिन्याप्रमाणे काम करणार्या एका साईभक्ताला शिर्डीमध्ये एका भामट्याने हजारो रुपयांना गंडा घातला. साईबाबांच्या धुनित जाळण्यासाठी अनेक साईभक्त उदी पॅकेट खरेदी करतात. शिर्डीतील अनेक दुकानांमध्ये हे पॅकेट 1 ते 2 रुपयांना सहज मिळतात. मात्र आग्रा येथील या साईभक्ताच्या भावनांचा फायदा घेत आणि त्याची दिशाभूल करून एका भामट्याने 1 ते 2 रुपयांना मिळणारे उदी पॅकेट प्रत्येकी 175 रुपयांना विकले. 40 उदी पॅकेटसाठी या भामट्याने संबंधित भाविकाकडून तब्बल 7 हजार रुपये उकळले आणि पसार झाला.

दर्शनासाठी मंदिरात जात असताना आणखी एका ठिकाणी उदी पॅकेटबद्दल चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे भाविकाच्या लक्षात आले. यानंतर साईभक्त दिपेश कुमार जॉली यांनी शिर्डी पोलीस ठाणे गाठले. शिर्डी पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवत अर्ध्या तासातच त्या ठकबहादरास पकडून ताब्यात घेतले. मात्र, दूरवरून आलेल्या या साईभक्ताने तक्रार नको, आपल्याला पुन्हा येण्यासाठी मोठी अडचण होईल, असे सांगत पैसे मिळाल्याचे समाधान मानले. शिर्डीत देशभरातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. काही भामटे भाविकांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक लूट करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे भाविकांनी देखील सजग राहाणे गरजेचे आहे.

साईबाबा संस्थानच्या शिर्डीतील द्वारावती भक्तनिवासाच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून अनेक भाविकांची ऑनलाइन रूम बुकिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी मुक्कामी येणारे भाविक संस्थानच्या आवाहनाप्रमाणे संस्थानच्या भक्त निवासातील रुम ऑनलाइन बुक करतात. याचाच फायदा काही भामट्यांनी घेतला आहे. साईबाबा संस्थानच्या वेबसाईटशी साधर्म्य असलेली बनावट वेबसाईट तयार करून त्यावर शिर्डीत साई संस्थान मार्फत चालविल्या जाणार्या द्वारावती भक्त निवासाचे फोटो टाकण्यात आले आहेत. त्याखाली दिलेल्या 7602853094 या नंबर वर फोन केल्यानंतर रुम बुक करण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची मागणी करण्यात येते. अनेक भाविक या फसवणुकीला बळी पडत असून शिर्डीत आल्यानंतर प्रत्यक्षात रूम बुक नसल्याने भाविकांना मनःस्ताप होत आहे. ज्या नंबरवर फोन करून रूम केली होती, त्या मोबाईल नंबरवर पुन्हा फोन केल्यास संबंधित भामट्याकडून हिंदी भाषेत शिवीगाळ करण्यात येते.

साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. संस्थानने त्या अज्ञात भामट्याविरोधात पोलीस ठाण्यात भादंवि कलम 419, 420 माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तर साईबाबा संस्थानची online.sai.org.in अधिकृत वेबसाईट असून (02423 ) 258775, 258960 तसेच 258500 हे अधिकृत फोन नंबर आहेत. साई संस्थानच्या कुठल्याही सुविधेविषयी माहिती पाहिजे असल्यास अधिकृत वेबसाईट आणि क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन साईबाबा संस्थान शिर्डीच्यावतीने करण्यात आले आहे.
