तीन दिवस उलटूनही खून झालेल्या इसमाचा मृतदेह सापडेना! आठ आरोपी ताब्यातच; मृतदेहाची ओळख पटविण्यासह गुन्हा सिद्ध करण्याचेही आव्हान..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुलाकडून आईच्या प्रियकराचा खून झाल्याच्या घटनेला तीन दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना मयताचा मृतदेह सापडलेला नाही. मागील 72 तासांपासून पोलिसांकडून खांडगावजवळील प्रवरानदीचे पात्र ते ओझर बंधार्यापर्यंतचा संपूर्ण परिसरात वारंवार शोध सुरु आहे, मात्र या शोधकार्यास अजूनही यश मिळालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आठ आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. त्यातच सदर मयताचा मृतदेह मोठ्या कालावधीपासून पूराच्या खळाळत्या पाण्यात असल्याने तो सापडल्यानंतरही त्याची ओळख पटविण्यासह खुनाचा गुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हानही पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आज (ता.13) बरेवाईट करण्याच्या इराद्याने अपहरण करण्याचे कलम 364 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता असून त्यानंतरच ताब्यात असलेल्या आठही संशयितांना अटक होणार आहे.

खंदरमाळवाडीच्या अंतर्गत येणार्या ऐठेवाडी येथील हा प्रकार असून अठरा वर्षांपूर्वी या परिसरातील एक विवाहित महिला आपला पती व मुलाबाळांना सोडून याच गावात राहणार्या बाळू शिरोळे या इसमासोबत पळून गेली होती. त्यावेळी अवघ्या 9 वर्षांच्या असलेल्या तिच्या मुलाला हा प्रकार खटकला होता. मात्र वय कमी असल्याने तो त्यावेळी काहीही करु शकला नव्हता, परंतु या संपूर्ण प्रकाराने त्याला व त्याच्या कुटुंबाला सोसाव्या लागलेल्या बदनामीची सल त्याच्या मनात कायम असल्याने प्रतिशोध घेण्याची ज्वाळा तेव्हापासून त्याच्या मनात प्रज्ज्वलित झालेली होती.

गेल्या बुधवारी (ता.10) बाळू शिरोळे हा संगमनेरच्या न्यायालयात येणार असल्याची पूर्वमाहिती त्या महिलेच्या मुलाला समजली. त्यानुसार त्याने पठारावरील व संगमनेर शहरातील काही अशा एकूण 10 ते 12 साथीदारांसह कट रचून संगमनेरात आलेल्या बाळू शिरोळेचे अपहरण केले. त्याला तेथून वेल्हाळी शिवारातील आडवळणावरील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. दिवसभर त्याला मनसोक्त मारहाण करुन आपल्या मनातील रागाचा अग्नी शांत केल्यानंतर मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदारांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या डोक्यात दगड घालून त्या खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह खांडगाव शिवारातील पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवरेच्या पुलावरुन नदीपात्रात फेकून दिला.

गुरुवारी (ता.11) याबाबतची कुणकूण समजताच संगमनेर शहर पोलिसांनी प्रकरणाची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आपल्या पथकाला कार्यान्वीत केले. समोर आलेल्या माहितीची खातरजमा करीत पोलिसांनी या घटनेचा उद्देश आणि त्याची माहिती मिळवित त्याच दिवशी मुख्य सूत्रधार सागर शिवाजी वाडगे व त्याचे वडील शिवाजी गेनू वाडगे या दोघांना ऐठेवाडीतून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून पोलिसांना जवळपास डझनभर लोकांची नावे समजली. त्यानुसार तत्काळ धाडसत्र राबवून पोलिसांनी एक-एक आरोपी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आरोपीने संबंधित इसमाचा मृतदेह प्रवरानदीत फेकून दिल्याची माहिती दिल्याने गुरुवारपासून त्याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

मात्र सध्या प्रवरा नदीपात्रात 11 हजार क्यूसेकहून अधिक वेगाने पाणी वाहत असल्याने गेल्या 72 तासांपासून खांडगाव शिवार ते ओझर बंधार्यापर्यंतचा संपूर्ण परिसर वारंवार पिंजूनही पोलिसांना अद्याप मृतदेहाचा शोध लावता आलेला नाही. दरम्यानच्या काळात पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने दोघा मुख्य सूत्रधारांसह दत्ता भाऊराव वाडगे, संपत मारुती डोळेझाके, दिनेश बाळू जेधे या पाच जणांसह आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालेला असला तरीही अद्यापपर्यंत मयताच्या कुटुंबाकडून कोणतीही फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही.

त्यातच बुधवारी नदीपात्रात फेकलेला मृतदेह अद्यापही सापडत नसल्याने पोलीस तांत्रिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एकूण आठही आरोपींना अद्यापही अटक झालेली नसून ते कारागृहाच्या बाहेरच आहेत. या घटनेला तीन दिवसांचा कालावधी होवूनही मयत बाळू शिरोळे याच्या परिवारातून कोणीही समोर यायला तयार नसल्याने मृतदेह सापडल्यानंतरही या प्रकरणात पोलिसांनाच फिर्यादी व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जोवर गुन्हा दाखल होत नाही तोवर आरोपींना कारागृहातही टाकता येत नसल्याने ताब्यात असलेल्या तब्बल आठ आरोपींना सुरक्षित ठेवण्याचे आव्हानही पोलिसांना पेलावे लागत आहे.

ऐठेवाडी येथील बाळू शिरोळे याचा खून करण्यापूर्वी त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरावर जागोजागी जखमा झालेल्या असण्याचीही दाट शक्यता आहे. त्यानंतरही जीवंत असलेल्या शिरोळेला रात्री उशिराने आरोपींनी दगडाने ठेचून मारले आहे. त्यामुळे साहजिकच रक्तबंभाळ अवस्थेत त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पाण्यात फेकून दिले गेल्याने व त्या घटनेलाही जवळपास 72 तासांचा कालावधी उलटल्याने त्याच्या मृतदेहाची अवस्था बिकट झालेली असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मृतदेह सापडूनही पोलिसांना त्याची ओळख पटविण्यासह खूनाचा हा भयंकर प्रकार न्यायालयात सिद्ध करण्याचे मोठे आव्हानही पेलावे लागणार आहे.

बुधवारी झालेल्या या हत्याकांडाचा प्रकार गुरुवारी समोर येताच पोलिसांनी मुख्य सूत्रधारांसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपींचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांकडे असल्याने त्या सर्वांचा कसून शोध घेतला जात आहे. यातील काही आरोपी पसार झाल्याचीही माहिती आहे. अर्थात पोलिसांना बारा आरोपींची नावे समजली असली तरीही त्या सर्वांचाच या हत्याकांडाशी थेट संबंध असल्याचा वृत्ताचा पोलिसांनी इन्कार केला आहे. यातील काहींना केवळ हा प्रकार माहिती होता तर काहीजण खून झाल्यानंतर आरोपींसोबत होते. त्यामुळे प्रत्यक्ष खुनाच्या गुन्ह्यात यातील निम्म्याहून कमी जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजही प्राप्त झाल्याची माहिती आहे, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

