बिहारला कोरोना लस मोफत, मग महाराष्ट्राचे काय? : थोरात


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरीबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का? असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारले आहेत.

भाजपच्या मोफत लसीच्या आश्वासनाचा समाचार घेताना मंत्री थोरात म्हणाले, कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे हे भाजपने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे असे सांगितले असताना बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्याचा भाजपचा हेतू काय. कोरोना लसीसाठी भारतीयांचा पैसा खर्च होणार आहे मग तो फक्त बिहारसाठीच का. इतर राज्यात लस देणार नाही? का त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. हा केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे बिहारवर जास्त प्रेम आहे असे म्हंटले होते. मग महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? का कमी प्रेम आहे? आणि जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत कोरोना लस देणार नाही का? असे प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केले आहेत.

Visits: 11 Today: 1 Total: 114769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *