संगमनेर तालुक्यात काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; केंद्र सरकारवर जोरदार टीका
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त सर्व गावांमध्ये काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा होत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ, घुलेवाडी, संगमनेर खु., समनापूर, तळेगाव, जोर्वे, आश्वी, साकूर, बोटा या गटातील गावांमध्ये आजादी गौरव पदयात्रा सुरू झाली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, बाबासाहेब ओहोळ, इंद्रजीत थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, शंकर खेमनर, सुरेश थोरात, मीनानाथ वर्पे, संतोष नागरे, संतोष हासे, विक्रम थोरात, रवी रोहम, भाऊसाहेब शिंदे, मीरा शेटे, जयराम ढेरंगे, इंद्रजीत खेमनर या पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमध्ये आजादी गौरव पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी मिलिंद कानवडे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करणार्या काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीत मोठे योगदान दिले आहे. ज्या देशांमध्ये सुई बनत नव्हती. त्या देशांमध्ये आज रॉकेट बनत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा धबधबा निर्माण झाला आहे. मात्र मागील सात वर्षापासून देशात सत्तेवर आलेल्या सरकारने काहीही केले नसून फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी जाहिरातबाजी सुरू केली आहे. आज देशांमध्ये प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, आर्थिक स्थिती ढासाळलेली आहे. अशा परिस्थितीत सरकार कोणतेही ठोस पावले उचलत नसून यावरून लक्ष हटविण्याकरीता जातीय तेढ निर्माण केली जात आहे. सध्या यावर आवाज उठविण्याविरुद्ध ईडी व तत्सम केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून दबाव टाकला जात आहे, हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. आणि म्हणून एकदा म्हणून पुन्हा एकदा लोकशाही बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष सरसावला असून विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्रात संगमनेर तालुक्यामध्ये काँग्रेसची पदयात्रा सुरू आहे.