साईबाबा संस्थान स्थापनेचा शताब्दी वर्ष सोहळा साजरा करा! साईभक्तांसह शिर्डी ग्रामस्थांची मागणी; सरकारकडूनही निधीची अपेक्षा

नायक वृत्तसेवा, शिर्डी
संपूर्ण विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे भारतातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्था स्थापनेला येत्या 13 फेब्रुवारीला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने साईबाबा संस्थान स्थापना शताब्दी वर्ष सोहळा साजरा होणार का? असा प्रश्न साईभक्तांना पडला आहे.

2018 साली साईसमाधी शताब्दी वर्षात देखील सरकारकडून संस्थानला एक छदामही न मिळाल्याने शताब्दी वर्षात करोडो भाविकांना वाटाण्याच्या अक्षदा दाखवून पदरी निराशा दर्शवली होती. त्यामुळे एकंदरीतच दोन्ही शताब्दी वर्ष साईभक्तांसाठी अनमोल ठेवा असताना संस्थान प्रशासनाने मात्र ते अपेक्षेप्रमाणे साजरा करायला हवे होते असे मत शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान हे श्री साईबाबांच्या समाधी मंदिराचे कामकाज पाहणारे व साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना सोयी सुविधा पुरविणारी देशातील दुसर्या क्रमांकाची श्रीमंत संस्था आहे. या संस्थानकडून इतरही अनेक समाजोपयोगी कामे केली जातात.

साईबाबा संस्थानची स्थापना 13 फेब्रुवारी, 1922 रोजी अहमदनगर सिटी सिव्हिल कोर्टाकडून करण्यात आली आहे. त्यावेळी महिपती दासगणू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पाच अजीव सदस्यांसह पंधरा जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. संस्थानची पहिली सभा दासगणू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. संस्थानच्या स्थापनेनंतर पहिल्या रामनवमीला म्हणजेच 6 एप्रिल, 1922 रोजी झाली. साईभक्तांकडून मिळणारी देणगी हे संस्थांचे उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यावेळी स्थापनेनंतर भक्त मंडळात 232 सदस्यांचा समावेश होता. आणी संस्थानकडे 2 हजार 238 रुपये होते. त्या तुलनेत मात्र शंभर वर्षात आताची सभासदांची संख्या 1 लाख 77 हजार इतकी आहे. आणी उत्पन्नातून सुमारे 2 हजार 500 कोटींहून अधिक ठेवी असून 450 किलो पेक्षा जास्त सोने, साडेपाच हजार किलो चांदी तर 10 कोटींचे मौल्यवान हिरे एवढी संपत्ती आहे. तसेच कायमस्वरूपी आणी कंत्राटी मिळून जवळपास सात हजार कामगार आहे. हा शंभर वर्षात झालेला एवढा मोठा फरक, असे असताना देशात दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या साईबाबा संस्थान स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहे. श्री साईबाबांची खरी महती ही सिनेअभिनेता मनोजकुमार यांनी 1977 साली निर्माण केलेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटामुळे साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचली आणि हाच चित्रपट साईबाबांच्या भाविकांसाठी मैलाचा दगड ठरला असून आज शिर्डीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. याचबरोबर शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिर आज सुवर्णमंदिर म्हणून ओळखले जात आहे. साईसंस्थान विश्वस्त मंडळामध्ये आजरोजी अनेक फेरबदल झाले. राज्य शासनाच्या अखत्यारीत साईसंस्थानचा कारभार गेल्याने या विश्वस्त मंडळात मागील पंधरा वर्षांपासून राजकीय सदस्यांची वर्णी लागतांंना दिसत आहे. मात्र राजकारणाच्या ह्या व्यस्त कारभारात संस्थान स्थापना शताब्दी वर्षाचा आजतरी प्रत्यकाला विसर पडला असल्याने करोडो साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
