जिल्हा परिषदेच्या लेखाधिकार्यांचा बंगला फोडला! संगमनेरात चोरट्यांचा धुमाकूळ; साडेसोळा तोळ्यांचे दागिने लंपास..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून संगमनेर शहर व उपनगरांमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून जवळजवळ दररोज चोरीची घटना समोर येत आहे. अशातच चोरट्यांकडून बंद असलेल्या घरांना लक्ष्य केले जात असल्याचे ठळकपणे समोर आले आहे. अशीच एक घटना शहरालगतच्या मालपाणीनगर या उच्चभ्रु वसाहतीमधूनही समोर आली असून जिल्हा परिषदेत लेखाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रुपेश भालेराव यांच्या बंगल्याच्या चक्क तिसर्या मजल्यावरुन चोरट्यांनी घरात प्रवेश करीत तब्बल साडेसोळा तोळे वजनाचे आणि पोलिसांच्या रेकॉर्डला अवघे तीनलाख रुपये मूल्य असलेले सोन्याचे दागिने चोरुन पोबारा केला. विशेष म्हणजे चोरी झाली त्यावेळी भालेराव आपल्या कुटुंबासह घरातच होते. मात्र त्यांना चोरट्यांनी चोरीचा अंदाजही येवू दिला नाही.
याबाबत त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता.6) ते आपल्या पत्नी व मुलांसह समनापूर येथे एका विवाह समारंभासाठी गेले होते. रात्री अकराच्या सुमारास ते मालपाणी नगर येथील आपल्या घरी परतल्यानंतर तिसर्या मजल्यावरील आपल्या शयनकक्षात झोपण्यासाठी गेले. शनिवारी (ता.7) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी आपल्या शयनकक्षाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरुन बंद असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीला उठवून कोणीतरी बाहेरुन दाराला कडी लावल्याचे त्यांना सांगितले. त्यावर भालेराव यांनी शेजारच्याच शयनकक्षात झोपलेल्या आपल्या मुलीला फोन करुन दरवाजा उघडण्यास सांगितला असता त्यांच्याही शयनकक्षाला बाहेरुन कडी लावल्याचे आढळले.
त्यामुळे घाबरलेल्या रुपेश भालेराव यांनी शेजारी राहणार्या महेश काळे यांना फोन करीत कोणीतरी आमच्या शयनकक्षाचे दरवाजे बाहेरुन बंद केल्याने ते उघडण्यास सांगितले व त्याचवेळी याबाबत त्यांनी पोलिसांनाही माहिती दिली. काही वेळातच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या बंगल्याजवळ पोहोचले. त्यावेळी दर्शनीभागातील प्रवेशद्वार व मुख्य दरवाजा बंद असल्याचे त्यांना आढळले. म्हणून पोलिसांनी बंगल्याची पाहणी केली असता दुसर्या मजल्यावरील स्वयंपाकगृहाचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी शिडीचा वापर करुन घरात प्रवेश केला व तिसर्या मजल्यावरील दोन्ही शयनकक्षाचे दरवाजे उघडले. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेवरुन दोघा पती-पत्नीने घरातील सामानाची स्थिती तपासली असता बंगल्यातील उर्वरीत सर्व खोल्यांमध्ये चोरट्यांनी मनसोक्त उचकापाचक केल्याचे त्यांना दिसून आले.
या दरम्यान त्यांच्या पत्नीने शयनकक्षाच्या बाहेर ठेवलेल्या लाकडी कपाटातील आपला ऐवज तपासला असता कपाटात ठेवलेली दागिन्यांची पर्स गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्या सर्वांनी गच्चीवर जावून पाहिले असता आंतून बंद असलेला दरवाजा गच्चीवरुन येवून तोडला गेल्याचे व तेथूनच चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दर्शनीभागात पाळीव कुत्रे असल्याने पाठीमागील बाजूने थेट तिसर्या मजल्यावर चढून गच्चीवरील दरवाजाचा कोयंडा तोडला व बंगल्यात शिरुन एकूण साडेसोळा तोळे वजनाचे व आजच्या स्थितीत तब्बल 12 लाख 87 हजार रुपये मूल्य असलेले नऊ तोळ्याचे दोन गंठण, चार तोळ्याचे हातकडे, दीड तोळ्याचा सुवर्णहार, प्रत्येकी आठ व पाच ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या व सात ग्रॅम वजनाची कर्णफुले असा ऐवज घेवून पोबारा केला. मालपाणीनगर हा परिसर उच्चभ्रु वसाहत म्हणून ओळखला जातो. अशा गजबजलेल्या ठिकाणावर चक्क तिसर्या मजल्यावर चढून चोरट्यांनी डाव साधल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
एकीकडे बंद असलेल्या घरांसह उच्चभ्रु वसाहतींमधील धनिकांची घरे फोडण्याचे सत्र सुरु असतानाच दुसरीकडे दुचाकीवरुन धुमस्टाईल रस्त्यावरुन जाणार्या महिलांचे गळे ओरबाडण्याच्या एकामागून एक घटनाही समोर येत आहेत. शुक्रवारीही अतिशय वर्दळीच्या नवीन नगर रस्त्यावरील कॅनरा बँकेजवळ एका महिलेला लक्ष्य करीत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओरबाडून पळ काढला. गेल्याकाही महिन्यांपासून शहरात सुरु असलेल्या चोरीट्यांच्या या धुमाकूळाने संगमनेरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांबाबत शंका निर्माण होवू लागल्या आहेत.
मालपाणी नगरमधील रुपेश भालेराव या शासकीय अधिकार्याच्या घरात चोरी करताना चोरट्यांनी चक्क तिसर्या मजल्याच्या गच्चीवर चढून दरवाजा तोडीत घरात प्रवेश केला. यावेळी घरातील माणसं दोन शयनकक्षात झोपल्याची पूर्वकल्पना असल्याप्रमाणे चोरट्यांनी दोन्ही खोल्यांना बाहेरुन कड्या लावल्या व त्यानंतर संपूर्ण घरात यथेच्छ उचकापाचक करुन कपाटात ठेवलेली दागिन्यांची पर्स लांबवली व पुन्हा गच्चीवर जावून त्यातील सर्व दागिने काढून घेत पर्स तेथेच टाकून पुन्हा आल्या मार्गानेच तेथून धूम ठोकली. चोरीच्या या प्रकाराने संपूर्ण शहरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.