जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी खासगी शिक्षकांचा आदर्श घ्यावा ः तनपुरे प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्यव्यापी सुवर्ण महोत्सव अधिवेशन
नायक वृत्तसेवा, नगर
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेमध्ये जो गोंधळ घातला जातो, त्यामुळे समाजामध्ये शिक्षकांची प्रतिमा मलीन होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी खासगी प्राथमिक शिक्षकांचा आदर्श घ्यावा व समाजात मलीन झालेली प्रतिमा पुसून टाकण्याचा प्रयत्न करावा, या शब्दांत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे कान टोचले.
महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या राज्यव्यापी सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटन राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप, किशोर दराडे, प्राथमिक शिक्षक संचालक दिनकर टेमकर, महासंघाचे राज्य अध्यक्ष कां. रं. तुंगार, मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल उरमुडे, जिल्हा सचिव शेखर उंडे, रघुनाथ ठोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष अन्सार शेख, सुभाष येवले, प्रशांत नन्नवरे व राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, प्राथमिक शिक्षकांनी राज्य व देश घडवण्याचे काम केले आहे. शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चांगली पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून. प्राथमिक शिक्षकांना बद्दल प्रत्येकाच्या मनात आदराची भावना असते. शिक्षकांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली जुनी पेन्शन योजनेसह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. शिक्षकांना हक्काचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने करावी लागतात ही घटना मनाला दुःख देणारी आहे. परंतु शासन चालवत असताना विचार करून काम करावे लागते. महाविकास आघाडी सरकारचे दोन वर्षे कोविडच्या महाभयंकर संकटकाळात गेले. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. आता सरकार पूर्वपदावर येत असून, खासगी प्राथमिक शिक्षकांचे एक-एक प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले.
महासंघाचे राज्याध्यक्ष तुंगार म्हणले, आमच्या संघटनेला 70 वर्षाची परंपरा असून आमदार मुकुंद कुलकर्णी यांनी या संघटनेची स्थापना केली आहे. यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. 2005 पासून जी जुनी पेन्शन योजना बंद केली आहे ती सुरू करावी, 30 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 1 शिक्षक मिळाला पाहिजे, चौथीनंतर खासगी प्राथमिक संस्थेला पाचवीचा वर्ग व सातवीनंतर आठवीचा वर्ग सुरू करण्याची परवानगी मिळावी. तसेच स्कॉलरशीप परीक्षा पुन्हा सुरू करा व केंद्र सरकारने नवीन शिक्षण कायदा आणला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करावी. यावेळी राज्यभरातील 100 वर्ष पूर्ण झालेल्या संस्था व शाळांचा गौरव करण्यात आला. याचबरोबर राज्यभरात स्कॉलरशीप परीक्षेत सर्वात जास्त विद्यार्थी बसण्याचा प्रथम क्रमांक अहमदनगर जिल्ह्याने मिळविला. द्वितीय क्रमांक सातारा तर तृतीय क्रमांक सांगलीला मिळाला. या सर्वांचा गुणगौरव करून रोख पारितोषिके देण्यात आली. प्रास्ताविक विठ्ठल उरमुडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय सुभाष येवले यांनी करुन दिला. सूत्रसंचालन संगीत बनकर व संजय निंबाळकर यांनी केले.