अकोल्याच्या आश्रमशाळेत शिक्षकाचे विकृत चाळे! अल्पवयीन विद्यार्थीनीची तक्रार; मुख्याध्यापिकेसह चौघांवर ‘पोक्सो’..

नायक वृत्तसेवा, अकोले
अव्यवस्था, गलथान कारभार, विद्यार्थ्यांची हेळसांड आणि अधिक्षकांचा अमानवीपणा अशा वेगवेगळ्या कारणांनी अकोल्यातील विविध आश्रमशाळा गेल्याकाही वर्षात सतत चर्चेत येत आहेत. त्यात आता आणखी एका संतापजनक घटनेचा समावेश झाला असून तालुक्यातील एका आश्रमशाळेतील शिक्षकासह एका साफसफाई कर्मचार्याने अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थीनीने महिला मुख्याध्यापिकेकडे तक्रार केल्यानंतर आरोपींच्या बदलीव्यतिरीक्त कोणतीच कारवाई झाली नाही, उलट याबाबत कोठेही वाच्चता न करण्याबाबत पीडितेला धमकावण्यात आले. याशिवाय शाळेतील एका निवासी शिक्षकाच्या बायकोने पीडित विद्यार्थीनीला वारंवार मुलांच्या नावाने चिडवण्यास सुरुवात केल्याने आणि अलिकडच्या काळात त्यात मुख्याध्यापिकाही सहभागी झाल्याने मानसिक अस्वस्थ झालेल्या अवघ्या चौदा वर्षीय पीडितेने गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेला हा मानसिक छळ आपल्या जन्मदात्यांना सांगितल्यानंतर त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात धाव घेत दाखल केलेल्या तक्रारीवरुन ‘त्या’ आश्रमशाळेतील विकृत शिक्षकासह सफाई कर्मचारी, मुख्याध्यापिका आणि टोचणे देणार्या शिक्षकपत्नी विरोधात पोक्सोसह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्यआरोपी भाऊराव धुपेकर या विकृत शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेतून अकोल्यातील आश्रमशाळा पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून शासनाने राज्यातील सर्व आदिवासी शाळांमधील व्यवस्थेचेच ‘ऑडिट’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार पीडित विद्यार्थीनी इयत्ता आठवीच्या वर्गात असताना दोन वर्षांपूर्वी घडला होता. शिक्षकीपेशालाच कलंकित करणार्या या अतिशय संताजनक घटनेत ‘त्या’ आश्रमशाळेत कार्यरत असलेला भाऊराव राया धुपेकर हा विकृत शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतानाही त्याच्या मुलींच्या वयाच्या कोवळ्या विद्यार्थीनींकडे विकृत नजरेने बघायचा. संधी मिळेल त्यावेळी नको तेथे स्पर्श करुन कोवळ्या वयाच्या मुलींच्या मनातही लज्जा निर्माण होईल असे कृत्य करायचा. 2023 साली एका दिवशी जेवणाच्या सुट्टीत अचानक हा विकृत पीडित विद्यार्थीनीच्या वर्गात आला आणि बेंचवर बसलेल्या मुलींना उद्देशून ‘काय करीत आहात?’ अशी विचारणा करु लागला.

या शिक्षकाच्या कृत्यातून त्यापूर्वीही त्याचा हेतू दिसून आल्याने त्यावेळी अवघ्या बारा वर्ष वय असलेल्या पीडितेने त्याला टाळण्यासाठी ती बसलेला बेंच सोडून दुसर्या बेंचकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भाऊराव धुपेकर नावाच्या शिक्षकात दडलेला दानव जागा झाला आणि त्याने त्या मुलीची एका हाताने मांडी पकडून दुसरा हात अन्य एका सतरा वर्षीय विद्यार्थीशी अश्लिल चाळे करण्यासाठी वापरला. एव्हढ्यावरच न थांबता या विकृताने तिसर्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीला त्याची पाठ खाजवून देण्याचे फर्मानही सोडले. हा सगळा प्रकार असह्य झाल्याने ‘त्या’ तिघी-चौघी तेथून तडक मुख्याध्यापिका श्रीमती कुलथे यांच्या दालनात पोहोचल्या व त्यांनी भाऊराव धुपकर नावाच्या शिक्षकाकडून सुरु असलेली विकृती त्यांच्या कानावर घातली.

खरेतर हा सगळाप्रकार ऐकल्यानंतर मुख्याध्यापिका कुलथे यांनी त्याच्यातील विकृत मानसिकता हेरुन त्यावेळीच त्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आणि त्याला सेवेतून कायमस्वरुपी बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची गरज होती. मात्र घडले भलतेच, या घटनेनंतर धुपेकर नावाच्या या महाशयांना पाठीशी घालीत अकोले शिक्षणविभागाने त्याला दुसर्या शाळेत पाठवले आणि त्याच्याजागी गभाले नावाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार गभाले आपला कबीला सोबत घेवून डेरे दाखलही झाले. या घटनेची मुलींच्या घरी अथवा अन्य कोठेही वाच्चता होवू नये याची पूर्ण काळजी घेत मुख्याध्यापिका कुलथे यांनी त्या विद्यार्थीनींना स्वतःची ‘शपथ’ देत भावनीक केले.

त्याला प्रतिसाद देत घडला प्रकार मनात जिरवून पुन्हा ज्ञानार्जनाला लागलेल्या मुलींचा त्रास मात्र तेव्हढ्यावरच थांबला नाही. तर, धुपेकर जावून त्यांच्याजागी आलेल्या गभालेंच्या पत्नीने पीडित मुलींना ‘लक्ष्य’ करीत त्यांना मुलांची नावे घेवून नाहक त्यांच्याशी संबंध जोडण्यास आणि त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली. हा प्रकार कमी होता म्हणून की काय पीडित विद्यार्थीनी गेल्यावर्षी इयत्ता नववीत असताना शाळेत मामा म्हणून आदराने ओळखल्या जाणार्या धांडे नावाच्या सफाई कर्मचार्याच्या मनातील विकृती जागृत झाली. त्यातून त्याने या विद्यार्थीनींचा पाठलाग, वारंवार त्यांच्या आसपास वावर आणि कपडे धूत असतानाही तेथे उभे राहून वाईट नजरेने वारंवार बघत बसण्याचा प्रकार सुरु केला.

त्याबाबत पीडितेने अन्य विद्यार्थीनींसह जावून मुख्याध्यापिका कुलथे बाईंकडे तक्रार केली. यावेळी तर त्यांनी चक्क तक्रारदार मुलींनाच ‘तुम्ही जर हा प्रकार घरी अथवा दुसरीकडे सांगितला तर तुम्हाला शाळेतूनच काढून टाकेल..’ अशी धमकीच भरली. त्यामुळे पीडित मुलींनी उगाच शिक्षणात अडथळा नको म्हणून हा प्रकारही गिळण्याचा प्रयत्न केला. त्यातच शैक्षणिक वर्षही संपले आणि दरम्यानच्या सुट्टीत ‘मामा’ नावाने ओळखल्या जाणार्या धांडे नावाच्या विकृताचीही दुसर्या शाळेत बदली करण्यात आली. मात्र या उपरांतही पीडितेच्या समस्या संपल्या नाहीत. पीडित मुलींच्या तक्रारीवरुन मुख्याध्यापिका बाईंना आपल्या दोन प्रिय सहकार्यांची अन्यत्र बदलीची शिफारस करावी लागल्याने त्यांचे मन दुखावले. त्यामुळे त्या चालूवर्षी पीडित मुलगी इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असताना तिला वारंवार दुशणं देतं तिचा अपमान करु लागल्या.

त्यामुळे अवघ्या 14 वर्ष चार महिने वयाची पीडित विद्यार्थीनी प्रचंड तणावाखाली आली. त्यातच सोमवारी (ता.21) पुन्हा मुख्याध्यापिका कुलथेबाईंनी पीडितेला बोलावून वाट्टेल तसे तोंडसुख घेतल्याने रडवेल्या झालेल्या पीडितेने शाळेच्या मोबाईलवरुन घरी फोन करीत गेल्या दोन वर्षांपासून शाळेत सुरु असलेल्या सगळ्या प्रकारांना वाचा फोडली. त्यातून आपल्या मुलीच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण झालेल्या तिच्या पालकांनी तिच्यासह थेट अकोले पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी विकृत शिक्षक भाऊराव राया धुपेकर (वय 43) याच्यासह धांडे मामा, मुख्याध्यापिका कुलथे आणि शिक्षकपत्नी गभाले (पूर्ण नावे माहित नाहीत) अशा चौघांवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याच्या कलम 8, 12, 17 सह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन मुख्यआरोपी भाऊराव धुपेकर याला मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता अटक करण्यात आली आहे. या घटनेने तालुक्यातील आश्रमशाळा पुन्हा चर्चेत आल्या असून त्यांच्या व्यवस्थेचेच ऑडिट होण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्याकाही वर्षांपासून अकोले तालुक्यातील आश्रमशाळा विविध कारणांनी सतत चर्चेत असून आदिवासी मुला-मुलींना शिक्षण घेताना आजही कशाप्रकारांचा सामना करावा लागतो याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यात प्रामुख्याने डिसेंबर 2022 मध्ये शिरपूंजे आश्रमशाळेतील अधिक्षक अश्विन पाईक याने सहा मुलांना जळत्या लाकडाने केलेली अमानवी मारहाण, फेब्रुवारी 2023 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे यांनी पैठण आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर आढळलेल्या 312 आजारी विद्यार्थीनी, एप्रिल 2023 मध्ये मवेशीतील शिक्षण संकुलातील गैरप्रकारातून आदिवासी मुलांची झालेली हेळसांड, गेल्यावर्षी फेब्रुवारीत दूधातून 96 विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा असे एकामागून एक प्रकार समोर आले असून तालुक्यातील सर्वच आदिवासी आश्रमशाळांमधील व्यवस्थेचे ‘ऑडिट’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

