राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सरुनाथ उंबरकर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील सरुनाथ उंबरकर यांची जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी उंबरकर यांना नियुक्ती पत्र प्रदान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी भल्या भल्यांना भिडणारे कार्यकर्ते म्हणून सरुनाथ उंबरकर जिल्ह्याला परिचित आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री दिलीप वळसे यांच्याशी ते थेट संपर्क साधणारे म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी 1999 साली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, संगमनेरचे दहा वर्षे तालुका कार्याध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते आणि वडगाव पान टोलनाका संघर्ष समिती आदी ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. याचबरोबर मुलभूत प्रश्नांबरोबर जायकवाडी पाण्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सदर नियुक्ती पत्र प्रदान करतेवेळी दिलीप शिंदे, प्रशांत वामन, आबासाहेब थोरात, सौरभ देशमुख, वैशाली राऊत आदी उपस्थित होते.