शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून छप्पन्न हजारांचा ऐवज लांबविला! चोर्‍यांचे सत्र थांबेना; पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घरफोडीची घटना

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु झालेले चोर्‍या आणि घरफोड्यांचे सत्र सुरुच असून आतातर चक्क संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अगदी डोळ्यासमोर असलेल्या भागातून घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत मोमिनपुरा परिसरात राहणार्‍या जाकीर अहमद शेख या सामान्य कुटुंबातील रंगकाम करणार्‍या इसमाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण 56 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. विशेष म्हणजे या घटनेत पोलिसांनी दाखल करुन घेतलेल्या तक्रारीत चोरीला गेलेल्या सोन्याचे प्रतितोळा मूल्य अवघे दहा हजार रुपये गृहीत धरल्याने पोलिसांकडून या घटनेचे गांभीर्य कमी करुन आपली लक्तरे लपविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ठळकपणे दिसून आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना गुरुवारी सकाळपासून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या कालावधीत घडली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच असलेल्या मोमिनपुरा परिसरात जाकीर अहमद शेख हा 28 वर्षीय तरुण राहतो. रंगकाम करणार्‍या या तरुणाने परिश्रमाने कवडी-कवडी करुन काही रक्कम आणि बचतीच्या पैशातून थोड्याफार प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने करुन ठेवले होते. गजबजलेल्या आणि त्यातही शहराच्या गावठाणभागात शहर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर रहात असल्याने कधीतरी आपल्या कष्टाच्या पैशांवर चोरटे डल्ला मारतील असा विचारही या तरुणाच्या मनात कधी निर्माण झाला नव्हता.

मात्र गेल्या काही कालावधीत संगमनेरात पोलिसांचे अस्तित्त्व असूनही नसल्यासारखे झाल्याने गुन्हेगार, अवैध व्यावसायिक आणि चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. हे स्पष्ट करणार्‍या असंख्य घटना गेल्या 8 ते 10 दिवसांतच समोर आल्या असून जाणता राजा मैदान ते मालदाड रोड परिसरात गेल्याच आठवड्यात झालेल्या एकामागून एक तब्बल एक डझनाहून अधिक घरफोडीच्या घटना, गुरुवारी पहाटे समनापूर शिवारात घडलेला रस्तालुटीचा भयंकर प्रकार आणि पंचायत समितीचे गोदाम फोडून अगदी स्टीलच्या फुलपात्रापासून ते प्लॅस्टिकच्या बादलीपर्यंतचा ऐवज लांबविण्याचा प्रकार संगमनेर शहर पोलिसांची निष्क्रीयता दाखवण्यास पुरेसा असतानाच शुक्रवारी या साखळीत आणखी एका घटनेची नोंद झाली.

जाकीर शेख हे आपल्या घराला कुलुप लावून काही कामानिमित्त गुरुवारी बाहेरगावी गेले होते. तेथील कामकाज आटोपून शुक्रवारी (ता.29) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते संगमनेरात परतले. घरी येताच घराचे दार उघडे असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या अनुपस्थितीत अतिशय गजबजलेल्या भागातील त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात इसमाने उघडून घरात प्रवेश केला व त्यांनी अतिशय कष्टाने जमा करुन ठेवलेली 24 हजारांची रोख रक्कम व दीड तोळे वजनाचे सोन्याचे पेंडल, मणी आणि कानातील डूल, तसेच दोन हजार रुपये किंमतीचे पायातील चांदीचे पैंजण असा एकूण 56 हजारांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला.

या प्रकाराने धक्का बसलेल्या जाकीर शेख यांनी लागलीच पोलीस ठाणे जवळ करुन आपली कैफीयत मांडली. मात्र एकामागून एक घटनांनी आधीच पोलिसांची लक्तरे वेशीवर लटकलेली असतांना आणि त्यातच पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस ठाण्यासमोरच्या वसाहतीमध्येच घरफोडीचा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी पन्नास हजारांहून अधिक मूल्य असलेल्या सोन्याची किंमत चक्क दहा हजार रुपये प्रतितोळा गृहीत धरुन दीड तोळे वजनाचे सोने अवघे 30 हजार रुपयांचे दाखवून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे सोपस्कार आटोपले. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल धनवट यांच्याकडे देण्यात आला खरा, मात्र गेल्या काही कालावधीत शहर पोलिसांकडून एकाही गुन्ह्याची उकल झालेली नसल्याने हे प्रकरणही एका प्रकारे बासनात गुंडाळले गेले आहे.


गेल्या वर्ष-दीड वर्षाच्या कालावधीत संगमनेर तालुक्यातील अर्धा डझन खुनाचे प्रकार, सोनसाखळ्या व दुचाक्या लांबविण्याच्या घटना व मोबाईल चोरीचे असंख्य गुन्हे उपविभागीय अधिकारी राहुल मदने व त्यांच्या पथकाने उघड केले आहेत. या विविध घटनांच्या तपासातून त्यांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमालही हस्तगत केला आहे. मात्र या सर्व तपास कामांचे संपूर्ण श्रेय उपअधीक्षक मदने व त्यांच्या टीमचे आहे. शहर पोलिसांकडून गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत एकाही गुन्ह्याची उकल झालेली नाही, यावरुनच त्यांची निष्क्रीयता अगदी उघड होते. शुक्रवारच्या घरफोडीच्या घटनेने शहर पोलिसांच्या निष्क्रीयतेवर एकाप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.

Visits: 551 Today: 4 Total: 1110246

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *