तालुक्यात एकमेकांवर हल्ल्यांच्या वाढत्या घटना! पिंपळगाव कोंझीर्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, तर रायत्यात बेदम मारहाण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
किरकोळ अथवा जुन्या कारणांवरुन भांडणे उकरुन एकमेकांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून तालुक्याच्या ग्रामीण भागातून अशाच दोन घटना समोर आल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत बायको माहेरी येत नसल्याच्या रागातून तरुणाने चक्क तलवारीने पत्नी व मेव्हण्यावर प्राणघातक हल्ला केला, तर दुसर्या घटनेत जुनी केस मागे घेण्याच्या कारणावरुन एका कुटुंबाने दुसर्या कुटुंबावर हल्ला करीत चौघांना जखमी केले आहे. या दोन्ही घटनांत सहा जण जखमी झाले असून सोळा जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
यातील पहिली घटना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील पिंपळगाव कोंझीरा येथून समोर आली आहे. धांदरफळ बु. येथे राहणारा आरोपी परेश माधव मुळे हा आपले साथीदार अमेय माधव मुळे, सागर बाजीराव भालेराव, अतुल संजय कोल्हे, सचिन गोपीनाथ म्हस्कुले, विलास किसन वाकचौरे, गणेश भास्कर क्षीरसागर, सनी सदाफुले, मयुर सदाफुले (रा.जामखेड) व रवी सोनवणे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही.) यांनी पिंपळगाव येथील परेश मुळे याच्या सासरी जात परेशच्या पत्नीला नांदण्यासाठी येण्यास सांगितले.
मात्र सदर विवाहितेने नांदायला येण्यास नकार दिला, त्यामुळे परेश मुळे याचा राग अनावर होवून त्याने सोबत आणलेल्या तलवारीने पत्नीवर वार केला. तो चुकवितांना त्यांनी हात मध्ये घातल्याने त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी त्या विवाहितेच्या मदतीला धावलेल्या तिच्या भावावरही हल्ला करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हा सगळा प्रकार सुरु असतांना मुख्य आरोपी परेश मुळेसोबत असलेल्या अन्य लोकांनी लाकडी दांडे व दगडफेक करुन फिर्यादीच्या दारात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनासह दुचाकीचे नुकसान केले. याशिवाय त्यांच्यावर दहशत निर्माण करतांना फिर्यादीच्या घरात घुसून धुडगूस घातला व घरातील सामानांची मोडतोड करीत घराची कौलेही फोडली. या प्रकरणी त्या विवाहितेच्या भावाने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दहा जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भा.द.वी.च्या कलम 307 सह 326, 324, 120 ब, 143, 147, 148, 149, 452, 337, 427, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यातील जखमींवर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विरु खंडीझोड करीत आहेत. यातील अमेय मुळे, अतुल कोल्हे, सचिन म्हस्कुले, गणेश क्षीरसागर व सनी सदाफुले या आरोपींवर यापूर्वीचे दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
दुसरी घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दितील रायते येथे घडली. या घटनेत आपल्यावर दाखल केलेली केस मागे घ्यावी यासाठी एका कुटुंबाने सुरुवातीला शेजार्याच्या मुलावर व नंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबावरच हल्ला चढवला. रायते शिवारातील देवगाव रस्त्यावर राहणार्या अण्णा भवर यांचा मुलगा शुभम घराखाली नळाचे काम सुरु होते तेथे गेलेला होता. अचानक त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्याचे आर्ई-वडील व घराखालीच असलेल्या किराणा दुकानातून त्यांचा दुसरा मुलगा त्याच्या दिशेने धावत गेले.
यावेळी शेजारी राहणारे प्रदीप रोहिदास बांगर, जयदीप रोहिदास बांगर, सुवर्णा जयदीप बांगर, वर्षा प्रदीप बांगर, मीराबाई रोहिदास बांगर व रोहिदास शंकर बांगर असे सगळेजण मिळून शुभमला मारहाण करीत असल्याचे त्यांनी पाहिले. सदरचे वाद सोडवण्यासाठी शुभमचे आई-वडील व भाऊ गेले असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्यातील दोघा-तिघांनी विटांचाही मारा केला. आमच्यावरील केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला मारुन टाकू असा दमही त्यांनी भवर कुटुंबाला भरला. या गदारोळात शुभम भंवरचा मोबाईल व सुनीता भंवर यांची सोन्याची पोत तुटून गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी वरील सहा जणांवर भा.द.वी.कलम 324, 327, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दुसर्या पक्षाकडूनही फिर्याद दाखल होण्याची शक्यता आहे.