डिझेल चोरट्यांचा पोलीस पथकावर हल्ला नेवासाचे पोलीस निरीक्षक विजय करेंसह कर्मचारी जखमी

नायक वृत्तसेवा, नेवासा
ट्रकमधून डिझेल चोरी करत असताना हटकल्यानंतर स्वीफ्ट कारमधून चोरट्यांनी पळ काढला. पोलिसांनी 150 ते 200 किलोमीटर पाठलाग केला. डिझेल चोरांची स्वीफ्ट कार अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक विजय करे व पोलीस कर्मचार्यांच्या अंगावर गाडी घातली. यात पोलीस निरीक्षक करे यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलासमोर 10 टायर मालवाहतूक करणारी ट्रक बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. शुक्रवारी (ता.17) पहाटे ट्रकच्या बाजूला एक स्वीफ्ट कार उभी राहिली. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व पोलीस कर्मचारी पहाटेची गस्त घालत असताना ट्रकमधील डिझेल काढताना चोरटे दिसले. पोलिसांनी चौकशी केली असता डिझेल चोरांनी आपली कार चालू करून पळून गेले.

निरीक्षक करे व पोलीस फौजफाट्याने चोरट्यांना पकडण्यासाठी 150 ते 200 किलोमीटर पाठलाग केला. नेवासा पोलिसांनी डिझेल चोरांची स्वीफ्ट कार अडविण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक करे व पोलीस कर्मचार्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये निरीक्षक विजय करे, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस हवालदार अंबादास गिते, योगेश आव्हाड, बाळासाहेब खेडकर, रामदास वैद्य, संदीप म्हस्के चोरट्यांच्या झटापटीत जखमी झाल्याची घटना घडली. या डिझेल चोरी प्रकरणातील मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेला एक आरोपी पकडण्यात नेवासा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
