संगमनेर शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव! अचानक विद्युत पुरवठाही होतो खंडीत; उपाययोजना करण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरात वाढलेल्या बेसुमार लोकवस्तीच्या माध्यमातून मूलभूत मागण्याही वाढल्या आहेत. त्यात प्रामुख्याने पाणी, आरोग्य, रस्ते व वीज या आवश्यक बाबी आहेत. गेल्या काही दशकांत संगमनेर शहराचा झपाट्याने विकास झाला असून निळवंडेच्या माध्यमातून शहरातील बहुतेक सर्वच वसाहती व घरांमध्ये पिण्याचे मुबलक पाणी पोहोचले आहे. मात्र आजही संगमनेर शहरातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात नगरपालिका अपयशीच ठरल्याचे वेळोवेळी दिसून येत असून सध्या पावसाळ्याच्या कालावधीत त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. पालिकेने तातडीची उपाययोजना करुन शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याची मागणीही आता पुढे आली आहे.

कधीकाळी गावठाणापर्यंत मर्यादीत असलेल्या संगमनेर शहराचा गेल्या काही दशकांत आजूबाजूच्या उपनगरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. साहजिकच लोकवस्तीची वाढ झाली की त्यातून मूलभूत गोष्टींच्या समस्याही निर्माण होतात. त्याप्रमाणे संगमनेरातही या गोष्टी निर्माण झाल्यात. मात्र संगमनेरचे लोकप्रतिनिधी, आमदार बाळासाहेब थोरात यांनी गेल्या चार दशकांच्या आपल्या प्रतिनिधीत्त्वातून संगमनेर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या योजना राबवून व त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून शहराचा सर्वकष विकास करण्याच्या दृष्टीने विविध विकासकामे केली आहेत.

सुमारे आठ वर्षांपूर्वीपर्यंत संगमनेरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. मात्र आमदार थोरात यांनी निळवंडे धरणाच्या निर्मितीला आपल्या जीवनाचे ‘लक्ष्य’ मानून ते पूर्ण करण्यासाठी प्रसंगी आपले मंत्रीपदही डावावर लावले आणि शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी थेट निळवंड्यातून संगमनेरात बंद पाईपातून पाणी आणले. त्यामुळे घराघरात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासह संगमनेरकरांचा अनेक वर्षांचा पाण्याचा दुष्काळही संपला. मात्र मुबलक पाणी मिळू लागल्याने त्याचा मुबलक प्रमाणात वापरही सुरु झाल्याने त्यातून आरोग्य विषयक समस्याही निर्माण झाल्या.

शहरातील कचरा स्वच्छ करण्यासाठी ठेकेदार आणि नित्यनेमाने घंटागाड्यांचीही व्यवस्था संगमनेर शहरात आहे. मात्र या उपरांत आजही अनेक ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्यासह कचरा टाकण्याची प्रवृत्ती मात्र कायम असल्याने त्यातून डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच शहरातून वाहणार्‍या म्हानुटी, नाटकी व लेंडी हे तीनही मोठे नाले, म्हाळुंगी नदीपात्रातून वाहणारे सांडपाणी, त्यातच म्हाळुंगीच्या परिसरात शहरातील पशु-पक्ष्यांच्या कत्तलखान्यातील टाकावू अवयव गुपचूप आणून फेकण्याचीही प्रवृत्ती अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बोकाळल्याने शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अनेकांना आरोग्य विषयक अडचणींचाही सामना करावा लागत आहे.

त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखल आणि घाणीचे साम्राज्यही अघायला मिळते. अशी स्थिती डासांचा प्रादुर्भाव होण्यासाठी पोषक असल्याने शहर व उपनगरांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची संख्या वाढली आहे. त्यातच पावसामुळे वीज पुरवठा बेभरवशाचा आणि अनियमित झाल्याने सर्वसामान्यांचा त्रास वाढला आहे. शुक्रवारी हा त्रास अतिशय प्रकर्षाने समोर आला. औद्योगिक वसाहतीकडे जाणार्‍या मुख्य वीज वाहिनीवर काही ठिकाणी झाडे पडल्याने वितरण कंपनीने सायंकाळपासून औद्योगिक वसाहतीसह पाणी पुरवठ्याचा फिडर बंद केल्याने या लाईनवरील मोठ्या भागाला आज पहाटे उशिरापर्यंत डासांच्या गराड्यात राहावे लागले. पावसाळ्याचा कालावधीत विविध संसर्गजन्य आणि किटकांपासून होणार्‍या विविध आजारांचा कालावधीत असतो. या काळात नागरीकांनी आरोग्याविषयी अधिक सतर्क राहण्याची गरज असते. त्यातच वीजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे पालिकेने शहरातील प्रत्येक भागात डास निर्मुलन औषधांची फवारणी करण्यासह डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती असला तरीही नागरी आरोग्य सर्वोच्च असल्याने त्याला प्राधान्य देण्याची गरजही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *