माझ्या आयुष्यातील अगस्तिची शेवटची निवडणूक ः पिचड राजूर येथे कारखाना निवडणुकीनिमित्त शेतकरी मेळावा
नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्तिच्या पेरणीला सुरुवात झाली असून प्रत्येक शेतकरी सभासदांनी पेरणीमध्ये सहभाग घेऊन शेतकरी विकास मंडळाला निवडून द्यावे. हे सांगतानाच माझ्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक असून ही निवडणूक म्हणजे माझी नव्हे तर तालुक्याच्या शेतकर्यांची परीक्षा असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.
राजूर येथे गुरुवारी (ता.7) झालेल्या शेतकर्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास माजी आमदार वैभव पिचड, इंदोरी गटातील उमेदवार प्रकाश नवले, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, सी. बी. भांगरे, सुरेश भांगरे, दिनेश शहा, भरत घाणे, सुरेश गभाले, विजय भांगरे, पांडुरंग खाडे, राजू पिचड, तुकाराम खाडे, संतोष बंनसोडे, गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, चंद्रकांत गोंदकर, पांडुरंग भांगरे, गंगाराम धिंदळे, सुनील सारुक्ते यांच्यासह आदिवासी भागातील ऊस उत्पादक उपस्थित होते.
याप्रसंगी सुरेश भांगरे म्हणाले, माजी मंत्री मधुकर पिचड हे अध्यक्ष होणार आहे. त्यामुळे समोरच्या उमेदवाराला मतदान करताना ही बाब लक्षात ठेवा. गोरक्ष परते यांनी अगस्ति कारखाना चालविणे म्हणजे दवाखाना किंवा दारूचे दुकान चालविणे नाही. त्यामुळे टोळीला हद्दपार करा. प्रकाश नवले यांनी आपले कुटुंब चालविताना एकाचे नेतृत्व लागते जर पाचसहा जण नेतृत्व करत असेल तर ते कुटुंब चालत नाही. समोरच्या समृध्दी मंडळाचे नेतृत्व कितीजण करतात व त्यांचा अध्यक्ष कोण? या प्रश्नांची उत्तरे तुम्हीच शोधा व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, ज्यांनी सत्तेची फळे भोगली. मनमानी केली ते लोक माझा पराभव झाल्यावर पिचड साहेबांनी चाळीस वर्षात काय केले हे इवळणे सुरू केले. यांचा निवडणुकीतील अजिंठा म्हणाजे पिचड कुटुंबियांना शिव्या देणे, तालुक्यात जलाशय बांधल्याने शेतकर्यांना पाणी उपलब्ध झाले त्यातून ऊसनिर्मिती झाली. कारखाना उभरला तरी तालुक्यातील विरोधकांना हा विकास दिसत नाहीये. यांना दिवसाचं रात आंधळे झाल्याचे दिसते अशी मिश्किल टिप्पणी केली. अडीच वर्षात काय दिवे लावले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर डांबर टाकत आहे, असा टोलाही आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता लगावला. तर ज्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, उपसभापती पद दिले त्यांनी काय टीका करावी. जनता सब जानती है. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अगस्ति कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले. तरी अविचारी मंडळींनी निवडणूक लादली. जनता जनार्दन त्यांचा योग्य न्याय निवडा करेल, माझा शेतकरी सभासदावर विश्वास आहे असे ते शेवटी म्हणाले.
ऊस उत्पादकांची बैठक सुरू असतानाच नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माजी मंत्री मधुकर पिचड यांना फोन आला. कारखान्याच्या निवडणुकीबाबत त्यांनी विचारपूस केली असल्याचे पिचड यांनी यावेळी सांगितले.