संगमनेरच्या जावेद हबीब सलुनमध्ये तरुणीचा विनयभंग! ‘युनिसेक्स स्पा’मधील प्रकार पुन्हा चर्चेत; कारागिरावर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्थानिकांच्या विरोधानंतरही संगमनेरात सुरु झालेल्या ‘जावेद हबीब युनिसेक्स सलुन’ या केशकर्तनालयातून अतिशय धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मंगळवारी या सलुनमध्ये केशभूषेसाठी गेलेल्या एका 35 वर्षीय तरुणीशी लगड करीत तेथील कारागिरानेच तिचा विनयभंग केला. या प्रकाराबाबत पीडितेने सलुनच्या चालकाकडे तक्रार केल्यानंतर त्याने आरोपी कारागिराच्या कानशिलात आवाज काढून पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या उपरांतही तक्रार देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलेली पीडित तरुणी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. परंतु येथेही तिला अशाच दबावाचा सामना करावा लागला. यावेळी चक्क शहर पोलीस ठाण्यातील एका वरीष्ठ अधिकार्‍याने स्वतःच न्यायाधीशाची भूमिका घेत पीडितेला तक्रार न घेताच अक्षरशः हुसकावून लावले. या घटनेबाबत शहरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी करुन दबाव निर्माण केल्यानंतर अखेर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन जावेद हबीब सलुनमधील ‘शाकीब’ नावाच्या कारागिरावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतून संगमनेरातील ‘युनिसेक्स’ सलुनमध्ये चालणारे प्रकार चव्हाट्यावर आले असून नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.9) दुपारी चारच्या सुमारास घडला. शहरात राहणारी एक 35 वर्षीय तरुणी जाणता राजा मैदानाजवळील ‘हबीब जावेद सलुन’मध्ये हेअर स्पा करण्यासाठी गेली होती. अशा प्रकारच्या ‘युनिसेक्स’ सलुनमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याचा दावा केला जातो, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट असल्याचे या घटनेत दिसून आले. सदरची महिला सलुनमधील महिलांच्या कक्षात पोहोचताच ‘शाकीब’ नावाचा इसम त्यांच्याजवळ आला व त्याने हेअर स्पा करण्यास सुरुवात केली.


या दरम्यान त्याने ‘मॅडम, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात’ असे म्हणतं ‘त्या’ महिलेशी लगड करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पीडित महिलेने कोणतीही प्रतिक्रिया टाळल्याने हिंमत वाढलेल्या आरोपीने पुन्हा ‘मला तुमचे प्रायव्हेट टॅटू किती आहेत ते दाखवा, मी तुमच्या बॉडीची मसाज खूप छान करुन देईल. आज माझ्याकडून बॉडी मसाज करुन घ्या’ असे म्हणत थेट पीडितेच्या पाठीवरच हात ठेवत महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने संतापलेल्या ‘त्या’ महिलेने आरोपीच्या कृत्यांना विरोध करीत या सलुनचा चालक आशीष महिरे याला फोन करुन तातडीने सलुनमधील महिला कक्षात येण्यास सांगितले.


त्यानुसार तो तेथे आला असता पीडितेने घडला प्रकार आणि कारागिराने केलेले कृत्य त्याच्या कानावर घातले. त्यावर संतप्त झालेल्या सलुन चालकाने पुढचा धोका ओळखून शाकीब नावाच्या कारागिराच्या मुस्कटात वाजवून प्रकरण जागेवरच मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत पीडितेने आपल्या दोघा मित्रांनाही सलुनमध्ये बोलावून घेत त्यांनाही घडला प्रकार सांगितला. त्यावरुन त्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिल्यानंतर ते तिघेही शहर पोलीस ठाण्यात आले. मात्र पीडितेचा पूर्वांध लक्षात घेत पोलीस ठाण्यातील एका वरीष्ठ अधिकार्‍याने कर्तव्य बजावण्याचे सोडून स्वतःच न्यायाधीश होवून चक्क पीडितेचेच कान उपटले आणि तक्रार न घेताच एकप्रकारे तिला हुसकावूनच लावले.


मात्र तोपर्यंत हा प्रकार शहरातील काही हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या कानावरही गेल्याने पोलीस ठाण्यात गर्दी होवू लागली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गेल्या महिन्यात शहरात घडलेल्या साखळी घटनांनी आधीच संगमनेरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते, त्यामुळे या प्रकरणात कातडी वाचवण्याचा प्रयत्न केल्यास तो अंगलट येण्याचा अंदाज येताच संबंधित अधिकार्‍यांनीही आपली भूमिका बदलली आणि सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करु पाहणार्‍या पोलिसांना पीडितेच्या फिर्यादीवरुन मोठा गाजावाजा करीत सुरु करण्यात आलेल्या शहरातील जावेद हबीब सलुनमधील कारागिर आरोपी शाकीब (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही.) याच्यावर त्याने केलेल्या कृत्यावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या घटनेने संगमनेरात एकच खळबळ उडाली असून अशाप्रकारच्या संयुक्त ठिकाणांवरील प्रकरणांची चर्चा भरात आली आहे.


आधुनिक जगातील सगळ्याच व्यवस्था बदलत असताना संगमनेरही त्यापासून मागे राहिलेले नाही. त्यातूनच काही वर्षांपूर्वी संगमनेरातील जाणता राजा मैदानाच्या परिसरात ‘जावेद हबीब’ या विख्यात केशभूषाकाराने संगमनेरातही आपली शाखा उघडून त्याचे कामकाज आशीष महिरे याच्यावर सोपवले. महिला व पुरुषांसाठी एकत्रित असलेल्या केशकर्तन दालनाला सुरुवातीला संगमनेरात विरोधही झाला होता, मात्र त्या उपरांतही सुरु झालेल्या या केशकर्तनालयात मंगळवारी घडलेल्या विनयभंगाच्या प्रकाराने अशाप्रकारच्या ‘युनिसेक्स’ ठिकाणांमधील कारनामे चव्हाट्यावर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *