अकोलेचा आठवडे बाजार चिखलाच्या विळख्यात! नगरपंचायतचे दुर्लक्ष तर लोकप्रतिनिधी राजकारणात व्यस्त..

नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या अकोले तालुक्याचा आठवडे बाजार दर गुरुवारी भरतो. यासाठी आदिवासी गावांतील असंख्य शेतकरी व व्यापारी दुकाने लावत असतात. मात्र, अनेक वर्षांपासून बाजारातील ओटे जीर्ण झाले आहेत. तर दिवसेंदिवस व्यापार्यांची संख्या वाढत असल्याने जमिनीवर दुकाने थाटावे लागतात. हा संपूर्ण परिसर पावसात चिखलमय होवून जातो. त्यामुळे व्यापार्यांसह ग्राहकांना चिखल तुडवीतच बाजार करावा लागतो. याकडे नगरपंचायतचे कायमच दुर्लक्ष होत आले आहे. तर लोकप्रतिनिधी देखील राजकारणातच व्यस्त असल्याने त्यांचेही इकडे लक्ष जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

आठवडे बाजार हा असंख्य शेतकरी व व्यापार्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असते. त्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी गुरुवारी आठवडे बाजारात येतात. आदिवासी शेतकरी देखील तांदूळ आणि भाजीपाला घेऊन येतात. तर ग्राहकांना आठवडाभराचा भाजीपाला खरेदी करायचा असल्याने त्यांची आठवडे बाजारात गर्दी होत असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून बांधलेले बाजारओटे आता जीर्ण झाले आहे. जमिनीवर दुकाने थाटली तर पावसाच्या पाण्याने संपूर्ण बाजाराचा परिसर चिखलमय होतो.

या चिखलातच व्यापार्यांना भाजीपाल्यासह इतर वस्तूंची विक्री करावी लागत आहे. ग्राहकांना चिखल तुडवत भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. अनेकदा चिखलामुळे व्यापार्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान होते तर ग्राहकांचेही चिखलात पाय रुतून पडण्याच्या घटना घडतात. दरवर्षी पावसाळ्यात अशी अवस्था तयार होते. मात्र याकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आलेले आहे. लोकप्रतिनिधी देखील कायमच राजकारणात व्यस्त असल्याने त्यांच्या निदर्शनास हा प्रकार येवूनही ते डोळेझाक करत असल्याचेच दिसून येत आहे.
