निसर्गाची शाळा सर्वात महत्त्वाची ः पद्मश्री पोपेरे सावरकुटे येथे जैवविविधता संवर्धन विषयावर कार्यशाळा

नायक वृत्तसेवा, अकोले
मी अनेक ठिकाणी गेले स्वागत, सत्कार कार्यक्रम बघितले, मोठमोठी सभागृह व कार्यक्रम स्थळे बघितली. परंतु निसर्गाच्या कुशीत आज आयोजित केलेला कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. जणूकाही आज निसर्गाची शाळाच भरली आहे. निसर्गाच्या शाळेतच मी माझे जीवन घडवले आहे. निसर्गाची शाळा कायम खुली असते आणि त्यात कोणीपण शिकू शकते हेच या शाळेचे वैशिष्ट्य आहे, असे भावनिक उद्गार बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी काढले.

एएसके फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ संस्था संचलित समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत एक दिवसीय जैवविविधता संवर्धन या विषयावर अकोले तालुक्यातील सावरकुटे येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ पर्यावरणवादी रमाकांत डेरे व प्रमिला डेरे यांनी अथक परिश्रमातून निर्माण केलेल्या सावरकुटे येथील वृक्षराजीच्या सान्निध्यात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारे नामवंत हजर होते. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, परसबागेच्या आधारस्तंभ शांताबाई धांडे, कृषी विभाग आत्माचे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे, बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे, जलतज्ज्ञ रामनाथ नवले, वनपुरुष तुकाराम गभाले, ज्येष्ठ सेंद्रीय शेतीतज्ज्ञ काशिनाथ खोले, पर्यावरणवादी व वनौषधी मित्र रामलाल हासे, संपत वाकचौरे, विजय डेरे, सुनीता डेरे, संजय डेरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शिवारफेरी दरम्यान पावसाच्या पाण्यावर केली जाणारी शेती व त्यातील विविधता, जल व मृद संधारण कामाच्या पद्धती व विकसित केलेले मॉडेल, पावसाच्या पाण्यावर भरले जाणारे शेततळे, आंबा, पेरू, चिक्कू, फणस, करवंद, जांभूळ, काजू, नारळ इत्यादी विविध फळझाडांची कोरडवाहू पद्धतीने लागवड याबद्दल निसर्गप्रेमी रमाकांत डेरे यांनी सखोल माहिती दिली. त्यानंतर परिसंवादाला सुरुवात झाली.

पुढे बोलताना पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या, निसर्गाच्या शाळेशी माझे अतूट नाते आहे. निसर्ग आपल्याला खूप देतो त्याचा आदर करत निसर्गाला समजून घेत आपले जीवन जगले पाहिजे असे भावनिक आवाहन करत निसर्गातील शाळेतील विठ्ठल आणि रखुमाई म्हणजे रमाकांत डेरे आणि प्रमिला डेरे होय असे गौरवोद्गार काढले. आत्माचे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे यांनी कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तालुक्यातील मसाला पिकांची लागवड, सुधारित पद्धतीने भाजीपाला व फळपिकांची लागवड, उन्हाळी नागली आणि वरई या पिकांची लागवड, फणस लागवड, पंतप्रधान सूक्ष्म खाद्य उद्योयम या योजनेबद्दलही सविस्तर माहिती दिली. प्रारंभी बायफ संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मोगरा रोपे देऊन केले. वॉटर संस्थेचे सोमनाथ गोसावी, किरण नन्नवरे, सुनंदा हासे आदी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बायफ संस्थेच्यावतीने विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, गोरख देशमुख, आनंदा घोलवड, राम भांगरे, खंडू भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन योगेश नवले यांनी केले.
