स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगराध्यक्ष व सरपंचाच्या निवडी थेट जनतेतून! आ. चंद्रशेखर बावनकुळे; पहिल्याच अधिवेशनात निर्णय होण्याची अपेक्षा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शीर्षनेतृत्त्वाची निवडणूक थेट जनतेतून व्हावी हा महायुती सरकारने घेतलेला निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बदलला होता. मात्र या निर्णयानंतर त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच राज्यात सत्तांतर घडल्याने पूर्वीचाच निर्णय लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या विषयाला अनुसरुन आमदार चंद्रकांत बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करुन तशी मागणी केली आहे. आगामी अधिवेशनात त्यावर निर्णय होण्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर दैनिक नायकने 30 जूनच्या आपल्या अंकात याबाबतची शक्यता वर्तविली होती, बावनकुळेंच्या आजच्या वक्तव्याने एकप्रकारे त्याला आता वास्तवाची किनार लाभली आहे.

याबाबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पत्रव्यवहाराबाबत माध्यमांना माहिती दिली. त्यानुसार राज्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे महायुती सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बहुसदस्यीय प्रभाग रचनेसह नगर परिषदा, नगर पंचायती व ग्राम पंचायतींचे शीर्षनेतृत्त्व (नगराध्यक्ष व सरपंच) थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातून राज्यातील 80 टक्क्यांहून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थेट जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्ष व सरपंचांनी पाच वर्ष स्थिर कारभार केला. या पाच वर्षात कोठेही या पदासाठी खेचाखेची अथवा अस्थिरता निर्माण झाली नसल्याचे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अस्तित्त्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्यीय प्रभागरचनेसह जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडीचा निर्णय बदलला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभार पुन्हा एकदा अस्थिर होण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायतींमध्ये अविश्वास ठराव आणण्याच्या कारवायाही वाढू लागल्या होत्या. मात्र आता राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे महायुती सरकारने पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसारच आगामी कालावधीत होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडाव्यात अशी आपली मागणी असल्याचे आ. बावनकुळे यांनी म्हंटले आहे.

त्यांनी पत्राद्वारे केलेल्या विनंतीत येत्या 18 जुलैपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनात पहिलाच निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांचे शीर्षनेतृत्त्व जनतेतून निवडण्याची पद्धत पुन्हा सुरु करुन करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या पत्रावर या दोन्ही नेत्यांकडून अपेक्षीत असलेली कारवाई होईल व राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वीच्या निर्णयानुसारच होतील असा विश्वासही आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सदरबाबतचा निर्णय आगामी अधिवेशनात झाला तर राज्यात वेगळे चित्र दिसेल हे मात्र खरे.

याबाबत दैनिक नायकने 30 जून रोजीच्या आपल्या अंकात ‘थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीच्या आशा पुन्हा एकदा जागल्या!’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध करुन राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून आपली धोरणं लागू केली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रव्यवहाराने एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तब झाले असून आगामी अधिवेशनात यावर निर्णय होण्याची दाट शक्यता असून राज्यात पुन्हा एकदा थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडीची पद्धत सुरु होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Visits: 233 Today: 2 Total: 1424358

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *