चुलत भावाचा खून करणार्‍यास आजन्म कारावास कौठेकमळेश्वर येथील घटना; जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच निकाल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शेतातील बांध कोरला म्हणून चुलत भावाने डोक्यात कुर्‍हाड मारून खून केला. या प्रकरणातील मयताचा चुलत भाऊ गोरख संपत यादव यास संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. एच. अमेठा यांनी आजन्म कारावास आणि 25 हजार रूपये दंड तर दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे, की संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे बांध कोरला म्हणून चुलत भावाने सतीष छबू यादव (वय 36, रा. कौठेकमळेश्वर) या तरूणाच्या डोक्यात कुर्‍हाड मारून खून केल्याची घटना 10 मे, 2020 ला घडली होती. याबाबत मयत सतीशचे वडील छबू माधव यादव यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गोरख संपत यादव (रा. कौठेकमळेश्वर) याच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी या गुन्ह्याचा सक्षमपणे तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

तब्बल दोन वर्षांनंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एच. अमेठा यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या घटनेत एकूण 31 साक्षीदार तपासले, तर 13 सबळ पुरावे देखील जोडण्यात आले होते. न्यायालयाने काही वैद्यकीय अधिकारी, परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार आणि तपासी अधिकारी पप्पू कादरी यांचे जबाब, सक्षम पुरावे ग्राह्य धरले. तसेच सरकार पक्षाचे वकील मच्छिंद्र गवते यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अमेठा यांनी गोरख संपत यादव यास आजन्म कारावास आणि 25 हजार रूपये दंड तर दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ. प्रवीण डावरे, सहा. फौजदार एस. डी. सरोदे, पोहेकॉ. सी. एम. जोर्वेकर, महिला पो. ना. दीपाली दवंगे, महिला पो. कॉ. स्वाती नाईकवाडी, सारिका डोंगरे यांनी काम पाहिले. या शिक्षेनंतर मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त केले आहे.

Visits: 158 Today: 4 Total: 1110742

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *