लालतारा प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबियांचा अल्पवयीन मुलीवर हल्ला! बारा जणांनी केली भररस्त्यात मारहाण; दंगलीसह विनयभंग व पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले नाका परिसरात राहणार्‍या गुंडांकडून लालतारा वसाहतीत हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आरोपींच्या कुटुंबियांनी त्याचा वचपा काढण्यास सुरुवात केली आहे. तसाच काहीसा प्रकार गुरुवारी सायंकाळी या परिसरातून समोर आला असून कामगार वसाहतीत राहणार्‍या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीसह तिच्या आईवर तब्बल बारा जणांनी हल्ला केला. विशेष म्हणजे या हल्ल्यात पोलिसांच्या मुखी पसार असलेल्या आरोपीचाही समावेश असून पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अकोले नाक्यावरील आठ महिलांसह एकूण बारा जणांवर दंगलीसह मारहाण, विनयभंग व पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतून या परिसरातील वाढलेल्या गुन्हेगारीचा स्तरही स्पष्ट झाला असून येथील गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचेही सिद्ध झाले आहे.

गेल्या बुधवारी (ता.30) संगमनेर नगर परिषदेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कामगारांच्या लालतारा वसाहतीत चोरट्यांनी दगडं, काठ्या, गलोलीच्या साहाय्याने हल्ला करीत एका दुचाकीची मोडतोड करीत तेथील महिलांना मारहाण केली व त्यांचा विनयभंग केला होता. यावेळी या चोरट्यांनी वसाहतीतल्या दोघींच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्रही आओरबाडून घेतले होते. याप्रकरणी पोलिसांनी एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करीत त्यातील पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील बहुतेक आरोपी अकोले नाका परिसरातीलच आहेत.

सदरचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरुन सदरील आरोपींच्या कुटुंबियांनी गुरुवारी (ता.31) लालतारा वसाहतीमधील एका अल्पवयीन मुलीला लक्ष्य केले. सदरची मुलगी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मोपेडवरुन भाजी घेण्यासाठी आली होती. यावेळी अकोले नाक्यावरील परिघा सूर्यवंशी, मथुरा सूर्यवंशी, कावेरी सूर्यवंशी, साक्षी सूर्यवंशी, कोमल सूर्यवंशी, उज्ज्वला सूर्यवंशी, पूनम माळी, जया सूर्यवंशी, साई शरद सूर्यवंशी, पोलिसांच्या मुखी पसार असलेला आदित्य संपत सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी व अतुल सूर्यवंशी या बाराजणांनी त्या सतरा वर्षीय मुलीला अडविले व तिला अश्लिलभाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगाने घाबरलेल्या त्या मुलीने लागलीच आपल्या आईला फोन करीत सदरचा प्रकार सांगितला. त्यावर जवळच असलेल्या लालतारा वसाहतीमधून त्या मुलीची आई धावतपळतच अकोले नाक्यावर आली. यावेळी वरील बाराजण त्यांच्या मुलीला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे त्यांना दिसले. यावेळी त्या माऊलीने आपल्या मुलीला सोडवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांनाही शिवीगाळ व मारहाण करीत त्यांचे कपडे फाडले. या दरम्यान सदर मुलीला जमिनीवर पाडून साई सूर्यवंशीने महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केली.

सायंकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ होती. त्यामुळे जमलेल्या लोकांनी आपल्या मुलीला या गुंडांच्या तावडीतून सोडवावे यासाठी त्या माऊलीने मोठा आकांत केला. मात्र सतत भांडणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या या लोकांबाबत माहिती असल्याने कोणीही त्या दोघींच्या मदतीसाठी पुढे सरसावले नाही. बराचवेळ सुरु असलेल्या या गदारोळानंतर त्या आई-लेकीने जमावाच्या तावडीतून आपली सुटका करुन तशाच स्थितीत धावत जावून पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील बारा जणांविरोधात भा.दं.वि. कलम 143, 147, 323, 354, 341, 504 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने अकोले नाका परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण तयार झाले असून अकोले नाका परिसरात तयार झालेल्या गुंडांच्या टोळ्या पोलिसांकडून उध्वस्त होण्याची आवश्यकता आहे.

Visits: 81 Today: 1 Total: 1103386

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *