जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येत आज पुन्हा झाली वाढ! संगमनेर शहरातील रुग्णही वाढले; एकूण रुग्णसंख्या मात्र नियंत्रणात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याला मिळत असलेला दिलासा आज मात्र भंग पावला असून सलग तीन दिवस पाचशेपेक्षा कमी झालेल्या रुग्णसंख्येने आज काहीशी उसळी घेतली आहे. आजच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातून दिडशे रुग्ण समोर आल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या वाढली आहे. त्याचवेळी कोपरगाव आणि जामखेड तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र एकेरीत आली आहे. आज संगमनेर शहरातील नऊ जणांसह एकूण 35 जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले असून त्यात अन्य तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 547 झाली आहे.


जिल्ह्यातील रुग्णगतीला अचानक ब्रेक लागल्याने गेल्या 4 जूननंतर जिल्ह्यातील कठोर निर्बंध मागे घेण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होवून बाजारपेठा खुल्या झाल्या. त्याचा परिणाम आता समोर यायला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील रुग्णगतीने पुन्हा काहीसा वेग घेतला आहे. अर्थात एका दिवसाच्या अहवालातून एकूण सरासरीवरील भाष्य घाईचे ठरणार असले तरीही जिल्हाधिकार्‍यांनी निर्बंध हटविल्यानंतर बाजारात होत असलेल्या गर्दीबाबत व्यक्त केलेली चिंता वाढलेल्या रुग्णसंख्येत स्पष्टपणे दिसून येत आहे. शासन आणि प्रशासनाकडून वारंवार संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत आवाहन करुनही अनेकजण कोविड कायमस्वरुपी गेल्याचा समज करुन ‘बिनधास्त’ वागू लागल्याने त्याचा हा परिणाम असण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.


आज खासगी प्रयोगशाळेचे 25 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीतून समोर आलेल्या दहा अहवालातून संगमनेर शहरातील नऊ जणांसह तालुक्यातील 35 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील 54 वर्षीय महिला, शिवाजी नगरमधील 47 वर्षीय इसम, पावबाकी रस्त्यावरील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोल्हेवाडी रस्त्यावरील 17 वर्षीय तरुण, नायकवाडपूर्‍यातील 30 वर्षीय तरुण व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 47 वर्षीय महिला, 39 व 36 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यासोबतच तालुक्याच्या ग्रामीणभागातीलकासारा दुमाला येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 59 व 35 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 59 व 55 वर्षीय इसम, वडगाव पान येथील 58 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण,


गुंजाळवाडीतील 50 व 48 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 44 वर्षीय इसमासह 37 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 65 वर्षीय इसमासह 18 वर्षीय तरुण, पिंप्री येथील 60 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 50 वर्षीय महिला, साकूर येथील 32 वर्षीय महिला, पेमगिरी येथील 23 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 46 वर्षीय इसम, कुरण येथील 55 वर्षीय महिला, निळवंडे येथील 44 वर्षीय इसम, हिवरागव पठार येथील 25 वर्षीय महिला व कनोली येथील 19 वर्षीय तरुण तसेच अकोले तालुक्यातील कळस बु. येथील 29 वर्षीय तरुणासह 25 वर्षीय महिला व कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील 34 वर्षीय महिला अशा एकूण 35 जणांना कोविडची लागण झाली आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 22 हजार 547 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.


आज अहमदनगर महापालिका क्षेत्रासह नगर ग्रामीण व पारनेर तालुक्यातून अधिक रुग्ण समोर आल्याने घसरणीला लागलेली जिल्ह्याची रुग्णगती पुन्हा काहीशी वधारली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाचशेपेक्षा कमी रुग्ण समोर येणार्‍या अहमदनगर जिल्ह्यात आज अचानक 679 रुग्ण समोर आले. त्यातील 315 रुग्ण वरील तिनही ठिकाणांहून समोर आले आहेत. आज शासकीय प्रयोगशाळेचे अवघे आठ, खासगी प्रयोगशाळेचे 145 व रॅपीड अँटीजेन चाचणीतून समोर आलेल्या 526 अहवालातून जिल्ह्यातील 679 जणांना कोविडची लागण झाली. त्यात सर्वाधीक 149 रुग्ण अहमदनगर महापालिका क्षेत्रातून तर 102 रुग्ण पारनेर तालुक्यातून समोर आले. तर जिल्ह्यातील अन्य ठिकाणांपैकी नगर ग्रामीण 64, पाथर्डी 49, राहुरी व शेवगाव प्रत्येकी 47, संगमनेर 35, राहाता 33, श्रीगोंदा 32, इतर जिल्ह्यातील 26, नेवासा 21, कर्जत व श्रीरामपूर प्रत्येकी 19, अकोले सोळा, जामखेड 9, कोपरगाव 7 व भिंगार लष्करी क्षेत्रातून चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या आता 2 लाख 74 हजार 558 झाली आहे.

Visits: 230 Today: 2 Total: 1103648

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *