शिवसेनेतील गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखविण्याची संगमनेरातून मागणी! जिल्हाप्रमुखांशी पत्रव्यवहार; विखे-पिचड समर्थकांचा सुळसुळाट असल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पक्षप्रमुखांनी पक्षाची संघटनात्मक फेररचना करण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेतही दुहेरी विचारधारा असलेल्या आणि प्रसंगी विखे-पिचड यांना फायदेशीर ठरणारी भूमिका घेणार्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणार्या आणि पक्षासोबतच पक्षनेतृत्त्वावर निष्ठा असलेल्या शिवसैनिकांची कुचंबना होत आहे. याची गांभीर्याने दखल घेवून स्वार्थी भावनेने शिवसेनेत घुसखोरी करुन पक्षाचे नुकसान करणार्या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. अहमदनगर शहर शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या मागणीने संगमनेरात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून नेमके ‘निष्ठावान’ कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत संगमनेर शहर शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांना पत्र पाठविले आहे. त्या पत्रात त्यांनी शिवसेनेतील घुसखोरांवर आक्षेप नोंदविला असून वेळीच त्यांना बाहेरचा रस्ता न दाखविल्यास पक्षाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. पक्ष सध्या मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे, अशावेळी पक्षप्रमुखांकडून संघटनात्मक फेररचना सुरू असताना जिल्ह्यातील गद्दारांचाही सोक्षमोक्ष व्हावा अशी अपेक्षा त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे समीकरण जुळल्यानंतर गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत स्वार्थी भावनेने शिवसेनेत घुसखोरी करुन विखे व पिचड यांच्या राजकीय फायद्यासाठी काम करणार्यांचे चेहरे उघडे पडले आहेत व त्याबाबत आवश्यक ते पुरावे यापूर्वीच जमा केले असल्याचेही या पत्रातून सांगण्यात आले आहे.
![]()
शिवसेना वाढीसाठी आजवर कोणताही फायदा न झालेल्या अशा लोकांमुळे निष्ठावान शिवसैनिक दुखावला गेला आहे. यापूर्वीच्या सत्ताकाळात जेव्हा जेव्हा स्थानिक शिवसेनेने भाजप विरोधात भूमिका घेवून आंदोलने केली तेव्हा ही मंडळी त्यापासून दूर राहिली, त्यावरुन त्यांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सिद्ध झाल्याचा आरोपही या पत्रातून करण्यात आला आहे. उत्तर नगरजिल्ह्यासह संगमनेर तालुका व शहर शिवसेनेत अशा दुहेरी विचारांच्या व्यक्तींचा मोठा सुळसुळाट असल्याचेही या पत्रातून सांगण्यात आले आहे. शिवसेनेशी गद्दारी करणार्या एका नेत्याला यापूर्वी स्थानिक शिवसैनिकांनी भररस्त्यात धडा शिकवल्याचा उल्लेख करुन पूर्वी विरोधात असलेल्या बाळासाहेब थोरात व काँग्रेसविरोधात वेळोवेळी आंदोलने केली, मात्र पक्षप्रमुखांचा आदेश येताच त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतल्याचे या पत्रात म्हंटले आहे.

शिवसेनेशी द्वेष करणार्या भाजपाविरोधातील आंदोलनात या विखे-पिचड यांच्या छुप्या समर्थकांनी कधीही सहभाग घेतला नाही. मात्र त्यातील काहींनी शिवसेनेतील महत्त्वाची पदं मिळवून पद्धतशीरपणे निष्ठावान शिवसैनिकांचे खच्चीकरण सुरू केले आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान होत असून वेळीच त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा गद्दारांची शिवसेनेतून हकालपट्टी होण्याची नितांत गरज असल्याचेही या पत्रातून सांगण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणारी संघटना असून निष्ठावान शिवसैनिकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच दैवत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शहरप्रमुख कतारींच्या या पत्राने स्थानिक शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली असून विखे-पिचड समर्थक कोण आणि खरे निष्ठावान कोण अशा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या पत्राची पक्षाकडून कशी दखल घेतली जाते याकडे आता स्थानिक शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

संगमनेरमध्ये अद्याप एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून कोणीही पुढे आलेले नाही, मात्र राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून शिवसेनेशी काहीएक घेणंदेणं नसलेले वेळोवेळी उघड झाले आहेत. अशा गद्दारांची माहिती संकलित करुन पुराव्यासह ती पक्षाच्या वरीष्ठांकडे पोहोचवण्यात आली आहे. शहर व तालुका शिवसेनेत विखे व पिचड यांना मानणार्या काहींचा शिरकाव झालेला आहे, वेळीच त्यांना रोखणे आवश्यक आहे. अन्यथा पक्षाला त्याचे नुकसान सोसावे लागेल असे आमचे मत असल्याने अशा गद्दारांची शिवसेनेतून हकालपट्टी व्हावी अशी मागणी आम्ही केली आहे.
– अमर कतारी (शहरप्रमुख – शिवसेना)
