चोळकेवाडी येथील तरुणीची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा
चोळकेवाडी येथील तरुणीची आत्महत्या; चौघांविरोधात गुन्हा
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील चोळकेवाडी येथील 21 वर्षीय तरुणीने नुकतीच आत्महत्या केली आहे. लग्नाच्या कारणावरून त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अस्तगाव येथील तिच्या नात्यातील चौघांविरुद्ध राहाता पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राहाता तालुक्यातील अस्तगाव चोळकेवाडी येथे राहणार्या तरुणीने गुरुवार दि.20 ऑगस्ट, 2020 रोजी विषारी औषध घेतले होते. त्यानंतर तिला नातेवाईकांनी औषधोपचारार्थ प्रवरा रुग्णालय लोणी येथे हलविले होते. दरम्यान, उपचार घेत असताना शनिवारी (ता.22) रात्री साडेअकरा वाजे दरम्यान तिचे निधन झाले. याबाबत तिच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यात म्हंटले आहे की, अस्तगाव येथील एका फोटोग्राफी दुकानावर माझ्या मुलीला घेऊन जात जितेंद्र लोंढे, चंद्रकला लोंढे, सचिन लोंढे व अशोक यादव (सर्व रा.अस्तगाव) यांनी लग्नाच्या कारणावरुन त्रास दिल्याने माझ्या मुलीने घरी परतल्यावर विषारी औषध घेतले. त्यानंतर आम्ही तिला दवाखान्यात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यावरुन राहाता पोलिसांनी वरील चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भोये व पथक करत आहे.

