मतदान केंद्रस्तरीय अधिकारी निवडणूक प्रक्रियेतील मुख्य आधारशिला ः पांडे
नायक वृत्तसेवा, शिर्डी
निवडणूक प्रक्रिया सुलभ व विनाअडथळा पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले ‘मतदान केंद्रस्तरीय अधिकारी’ हे या सर्व निवडणूक प्रक्रियेचे मुख्य आधारशिला असतात, अशा शब्दांत भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी आज येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पदाचे महत्त्व विशद केले.
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी अहमदनगर जिल्हा व शिर्डी मतदारसंघातील विविध निवडणूक विषयक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपसचिव ए. एन. वळवी, अवर सचिव शुभा बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. पुढे बोलताना आयुक्त पांडे म्हणाले, मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती होणे गरजेची आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक जलद व विश्वासार्ह होण्यासाठी दिवसेंदिवस आधुनिकतेची कास धरण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निवडणूक कामाबाबत केलेली डायरी उत्कृष्ट झाली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांचे कामकाज सादरीकरण इतरांना अनुकरणीय व प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी निवडणूक प्रक्रियेतील गरुडा अॅप, दिव्यांग, समान फोटो नोंदी, दुबार नोंदी, व्हीव्हीपीएटी मशीन संदर्भात मार्गदर्शन केले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्ती, मानधन याबाबत त्यांनी माहिती घेतली. राहाता तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांनी केलेल्या कामकाजाची पुस्तिका पाहिली. मुंबईच्या राज्य मुख्य निवडणूक कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना नाशिक विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी व तहसीलदार कुंदन हिरे यांना जिल्ह्यातील उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्कारांचे वितरण केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त पांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, सुधाकर ओहोळ, शंकर रोडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दत्ता गायकवाड, देविदास बनकर, विजय फटांगरे, संदीप गाढे, रमेश राऊत, निखील हातांगले, राजू सय्यद, दीपक साखरे, माऊली जवक, मंडळ अधिकारी गुगळे, तलाठी झेंडे, आरसेवार, बोडमवाड, बिराजदार, डाटा ऑपरेटर राजू शेख उपस्थित होते.