भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील निसर्ग सौंदर्य खुलले! पावसाला जोर नाही मात्र आषाढसरी कायम; जलप्रपातही कोसळू लागले

नायक वृत्तसेवा, अकोले
निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त लाभलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मान्सून सक्रीय असला तरीही पावसाला अद्याप जोर चढलेला नाही. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून अधुनमधून कोसळणार्‍या सरींनी निसर्गाचा नूर पालटवला आहे. सह्याद्रीच्या पर्वतराजीतून अनेक जलप्रपात कोसळू लागल्याने पर्यटकांचे पायही पाणलोटाच्या दिशेने वळू लागले आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत भंडारदर्‍याचा जलसाठा 580 दशलक्ष घनफूटाने वाढला असून उर्वरीत सर्वच धरणांना मात्र अद्यापही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदर्‍याच्या पाणलोटातील संततधार कायम असून धरणातील पाणीसाठ्यात 196 दशलक्ष घनफूटाची भर पडली आहे. मुळा खोर्‍यातील आंबित लघु पाटबंधारे प्रकल्प भरला असला तरीही मुळा नदी अद्यापही वाहती नसल्याने पिंपळगाव खांड प्रकल्पात अजूनही नवीन पाणी दाखल झालेले नाही.

यावर्षी वेळेपूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र नेहमीप्रमाणे तो फोल ठरल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा तब्बल पंधरा दिवस उशिराने भंडारदर्‍याच्या पाणलोटात पावसाचे आगमन झाले. गेल्या आठ दिवसांपासून मुळा व भंडारदरा या दोन्ही धरणांच्या पाणलोटात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र अवघा जून महिना उलटूनही अद्याप पावसाला म्हणावा तसा जोर नसल्याने आदिवासी पाड्यातील चिंता काही प्रमाणात वाढली आहे. सध्या सुरु असलेल्या जेमतेम पावसांत आदिवासी बांधवांनी भात लागवडीची पूर्वतयारी सुरु केली असून रेडक्याच्या मदतीने मशागतीची कामे सुरु असल्याचे चित्र दुर्गम आदिवासी भागात दिसू लागले आहे.
भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातही उशिराने दाखल झालेल्या पावसाने अपवाद वगळता सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे अकोल्यासह संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील खरीपाच्या पेरणीची कामेही जवळपास पूर्ण झाली असून शेतकरी सध्यातरी समाधानी असल्याचे चित्र आहे. संगमनेर तालुक्यातील पठारभागाला मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा असून या भागातील बहुतेक पेरण्याही खोळंबल्या आहेत. अशीच परिस्थिती तालुक्याच्या निमोण परिसरातील दुष्काळी भागात असून तेथील शेतकर्‍यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या लाभक्षेत्रातील बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र पावसाचा कोठेही मागमूस नसल्याचे दृष्य पहायला मिळत आहे.

उशिराने का होईना मात्र भंडारदर्‍याच्या पाणलोटात मान्सून दाखल झाल्याने एकीकडे समाधान निर्माण झालेले असल्याने दुसरीकडे लाभक्षेत्रातील काही भागात आत्तापर्यंत समाधानकारक तर काही भागात जेमतेम अथवा पाऊस नसल्याची स्थिती आहे. पाणलोटातील पावसाने मात्र भंडारदरा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलवले आहे. आत्तापर्यंत डोंगरमाथ्यावरच जिरणार्‍या पावसाचे पाणी आता मात्र माथ्यावरुन जमीनीकडे झेपावू लागल्याने पाणलोटातील असंख्य जलप्रपात सक्रीय झाले आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून या भागात पाऊस पडत असल्याने डोंगरांचे माथे आणि रस्त्यांच्या कडांनी हिरवा रंग धारण केल्याने परिसरातील वातावरण अल्हाददायक बनले आहे. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाची भूरळ पडत असून परिसरात निसर्गप्रेमींची गर्दीही वाढू लागली आहे.

आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत भंडारदर्‍याच्या पाणलोटातील घाटघर येथे सर्वाधीक 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल रतनवाडी 57 मिलीमीटर, पांजरे 52 मिलीमीटर, भंडारदरा 50 मिलीमीटर, वाकी 40 मिलीमीटर, निळवंडे व अकोले येथे प्रत्येकी अवघ्या एक मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. मागील चोवीस तासांत भंडारदरा धरणात 196 दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात 22 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात 8 हजार 268 दशलक्ष घनफूट (31.80 टक्के) पाणी असून भंडारदरा 2 हजार 829 दशलक्ष घनफूट (25.63 टक्के), निळवंडे 3 हजार 566 दशलक्ष घनफूट (42.86) तर आढळा धरणात 415 दशलक्ष घनफूट (39.15 टक्के) इतका पाणीसाठा आहे.

Visits: 51 Today: 2 Total: 307935

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *