कोविडने घेतला संगमनेरातील सत्ताविसावा बळी..! कोविड नियमांचे पालन करून सुरू असलेल्या गणेश विसर्जनाच्या उत्साहावर पडले विरजण..!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरकर प्रशासकीय सूचनांनुसार साध्या पद्धतीने गणेश विसर्जनाच्या आनंदात मग्न असतानाच संगमनेरकरांना धक्का देणारे वृत्त दैनिक नायकच्या हाती आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून कोविड विषाणूंचा सामना करणाऱ्या शहरातील 70 वर्षीय इसमाचा श्वासाशी सुरु असलेला संघर्ष आज थोटका पडला असून कोविडने शहरातील बाराव्या तर तालुक्यातील सत्ताविसाव्या बळीची नोंद केली आहे. या वृत्ताने नियमांच्या मर्यादेत असलेल्या संगमनेरकरांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
गेल्या 26 ऑगस्ट रोजी संगमनेर शहरातील माळीवाडा परिसरात राहणाऱ्या 70 वर्षीय इसमास कोविडची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र सदर इसमाची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी घोटीच्या एस.एम.बी.टी रुग्णालयात हलवण्यात आले होते. गेल्या पाच दिवसांपासून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान अनेक वेळा त्यांची प्रकृती गंभीर व सौम्य होत राहिली.
मात्र, रुग्णालयातील आरोग्यदूतांनी त्यांच्या संघर्षाला पाठबळ देत त्यांचा श्वास सुरू ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले. या दरम्यान अनेक वेळा सदरील रुग्ण आपल्या हातात असल्याचा विश्वासही वैद्यकीय पथकाला मिळत राहिल्याने त्यांनी धन्वंतरीची सेवा कायम ठेवली. मात्र त्यांचा हा प्रयत्न आज कमी पडला.
संबंधित सत्तर वर्षीय रुग्णाची आज सकाळपासूनच घालमेल सुरू झाल्याने वैद्यकीय पथकाची धावपळ वाढली. त्यातच रुग्णाची प्रकृती कमालीची खालावल्याने अखेर त्यांना कृत्रिम प्राणवायू पुरवण्यात आला होता. मात्र, त्याचाही फायदा झाला नाही. आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वैद्यकीय पथकासह बाधित रुग्णाचे कुटुंबीय व त्यांच्या स्नेही जणांनी बाप्पांचा केलेला धावा कमी पडला आणि अखेर सदर व्यक्तीचा कोविडने बळी घेतला. या मृत्युने संगमनेर शहरातील बाराव्या बळीसह तालुक्यातील सत्ताविसावा बळी नोंदविला आहे.
कोविडच्या संक्रमणातून दुर्दैवी बळी गेलेला माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली व्यक्ती म्हणून परिचित होती. सामाजिक गरजेच्या अन्नधान्य वितरणात अग्रेसर असलेल्या संबंधित इसमाचा संपूर्ण शहरातील विविध समुदायाशी जिव्हाळ्याचा संबंध होता. आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मृत्यूची वार्ता समोर येताच माळीवाड्यासह शहरातून हळहळ व्यक्त झाली.
रात्री उशिराने त्यांचा मृतदेह घोटीहून संगमनेरात आणण्यात आला असून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत आणि कोविड मृत्यु अंत्यसंस्काराच्या सर्व नियमांचे पालन करून त्यांना अग्निडाग देण्याची तयारी करण्यात आली आहे. या वृत्ताने माळीवाड्यासह शहरातील अनेक भागातून दुःख व्यक्त करण्यात आले आहे.
आज सकाळपासून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून संगमनेरकर नागरिक नगर परिषदेने उभ्या केलेल्या मूर्ती संकलन केंद्रात गणेशमूर्ती नेऊन तेथेच विधीवत पूजा करीत त्यांच्या हाती मूर्ती सुपूर्द करीत होते. कोविडमुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहावर मर्यादा पडल्याने काहीशा हिरमुसलेल्या वातावरणात हा उत्सव साजरा होत असतानाच सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास माळीवाड्यातील सदर इसमाच्या मृत्यूची वार्ता धडकल्याने संगमनेरकरांमधून हळहळ व्यक्त होत आहे.