कोपरगाव पालिकेचे मोकाट जनावरांकडे अक्षम्य दुर्लक्ष ः कदम
कोपरगाव पालिकेचे मोकाट जनावरांकडे अक्षम्य दुर्लक्ष ः कदम
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव पालिका हद्दीतील प्रभाग दोनमध्ये मागील गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा प्रमाणात वावर वाढलेला आहे. याबाबत आरोग्य विभाग प्रमुखांना वारंवार फोनवर तसेच व्हाट्सअॅपद्वारे फोटो टाकून याबाबतची कल्पना दिलेली असतानाही त्यांनी कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. तसेच पालिका प्रशासनाकडून साधी दखलही घेतली नसल्याने मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एखादा निष्पाप बळी जाण्याची पालिका वाट पाहत आहे का? असा उद्विग्न सवाल नगरसेवक जनार्दन कदम यांनी केला आहे.

मागील तीन दिवसांमध्ये मोकाट जनावरांकडून नागरिकांवर प्राणघातक हल्ले होत आहे. दोन दिवसांपूर्वी दोन नागरिक या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात जखमी झालेले आहे. तसेच मागील आठवड्यात एका लहान मुलाला मोकाट कुत्र्याने चावा घेण्याचाही प्रयत्न केला असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले. परंतु, नुकताच पालिकेच्या महिला सफाई कर्मचार्यावर मोकाट जनावराने प्राणघातक हल्ला केला. काही सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिची त्यातून सुटका झाली. मात्र, पालिका प्रशासन दखल घेऊन हा प्रश्न सोडवत नसेल तर आम्ही समस्या मांडायची तरी कुणासमोर? असा उद्विग्न सवाल नगरसेवक कदम यांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आरोग्य प्रमुखांना विचारला आहे. आता तरी किमान याची दखल घेऊन तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करुन नागरिकांची भीती दूर करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

