चांगल्या कामाची पावती मिळतेच ः भाऊ जाखडी पोलीस उपनिरीक्षक यादव, पारधी, फटांगरे, गायकवाड यांचा सत्कार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काम कोणतेही असू द्या ते जर मन लावून प्रामाणिकपणे करीत राहिले तर त्याची पावती, त्याचे फळ हे मिळतेच, असे उद्गार संगमनेर पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी काढले.

संगमनेर पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब यादव, बाळासाहेब पारधी, शिवाजी फटांगरे, राजेश गायकवाड यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने जाखडी यांनी केला. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, विशाल जाखडी, सागर काळे, प्रतीक जोशी, अजित देशपांडे आदी उपस्थित होते.

‘यादव, पारधी, फटांगरे आणि गायकवाड यांनी आपल्या आजवरच्या सेवा कार्यकाळात पोलीस खात्याने दिलेल्या सर्व जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे त्यांना पदोन्नती प्राप्त झाली. पोलीस खात्यातील सर्वांच्या समोर त्यांनी सेवेच्या माध्यमातून आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या कामाचा झपाटा त्यांना पदोन्नतीकडे घेऊन जाणारा ठरला. भविष्यात देखील आपल्या कामाने ते सतत पुढे जात राहतील यात शंका नाही’, असे जाखडी यावेळी म्हणाले. पुरोहित प्रतिष्ठानने केलेल्या सत्काराबद्दल यादव, पारधी, गायकवाड, फटांगरे यांनी कृतज्ञता व्यक्त करून नवीन जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याची ग्वाही दिली.
