बिग मी इंडिया कंपनीकडून पावणे आठ कोटींची फसवणूक नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौघांना केली अटक

नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगरमधील बिग मी इंडिया कंपनीद्वारे आर्थिक गुंतवणूकदारांची सुमारे पावणे आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सोनिया सोमनाथ राऊत, वंदना चंद्रकांत पालवे, प्रीतम मधुकर शिंदे व शलमन दावित गायकवाड या चौघांना अटक केली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा अतिरिक्त कार्यभार असलेले पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय नाईक पाटील व सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते यांच्यासह पोलिस पथकाने ही कामगिरी केली.

बिग मी इंडिया कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची सात कोटी 76 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार कोल्हापूर येथील सतीश खोडवे यांनी 4 डिसेंबर, 2021 रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. या आर्थिक गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे सुरू आहे. पोलिसांनी या आधी बिग मी इंडिया कंपनीचा प्रमुख सोमनाथ राऊत याला अटक केली आहे. तर अन्य आरोपींपैकी सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा न्यायालायाने फेटाळला आहे. त्यानंतर यातील आरोपी संचालक सोनिया सोमनाथ राऊत हिने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, पण तोही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करीत सोनिया राऊतसह वंदना पालवे, प्रीतम शिंदे व शलमन गायकवाड या चौघांना अटक केली.

या आर्थिक गुन्ह्यासंदर्भात 67 गुंतवणूकदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. यातून कंपनीसमवेत झालेले त्यांचे करार, गुंतवणूक रकमेची पावती, धनादेश, गुंतवणूक केलेल्या रकमांचे बँक स्टेटमेंट, बिग मी इंडिया कंपनीने केलेल्या जाहिराती, जाहीर केलेले बिझनेस प्लॅन आदिंसह वापरण्यात आलेले मोबाईल व मोबाईल नंबर, व्हाट्सअॅप मेसेज, कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग वृत्तपत्रांतून केलेल्या जाहिराती, गुंतवणूकदारांना जास्त गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या लेटर हेडवर दिलेले पत्र, गुंतवणुकीवरील परताव्याचे आमिष अशा पुराव्यांचा यात समावेश आहे.
