अमृतसागर’ दूध उत्पादकांसह कर्मचार्यांची दिवाळी गोड करणार ः पिचड दूध संघाची 45 वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने उत्साहात संपन्न
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांची दिवाळी निश्चितच गोड करू. जास्तीत जास्त रिबेट देण्याचा अमृतसागर दूध संघाचा प्रयत्न असून, कर्मचार्यांना देखील बोनस व वेतन वाढ देणार आहोत अशी ग्वाही अमृतसागर सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी दिली.
अकोले तालुक्यातील शिखर संस्था समजल्या जाणार्या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अधिमंडळाच्या 45 व्या ऑनलाइन वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा संघाचे अध्यक्ष वैभव पिचड हे होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, संचालक गोरक्ष मालुंजकर, विठ्ठल डुंबरे, विठ्ठल चासकर, शरद चौधरी, भाऊपाटील नवले, सोपान मांडे, रामदास आंबरे, सुभाष बेणके, प्रवीण धुमाळ, रवींद्र हांडे, नंदा कचरे, रेखा नवले, प्रभारी कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, श्री. शेटे, लेखापाल सत्यवान चौधरी उपस्थित होते.
यावेळी पबोलताना अध्यक्ष पिचड पुढे म्हणाले, कोविड काळात अमृतसागर दूध संघाने फक्त एकच दिवस दूध संकलन बंद ठेवून शेतकर्यांची गैरसोय होऊ दिली नाही. सर्वसामान्य गरजू, गरीब, अबालवृद्ध महिला, बालके यांच्यापर्यंत दूध पोहोचविले. तालुक्यात सुरू असलेल्या कोविड सेंटरलाही मदत केली. सद्यस्थितीत संघाचे दूध संकलन 1 लाखांवर पोहोचले असून, वर्षभरात सुमारे 2 कोटी 70 लाख लिटर दूध संकलन तर दैनंदिन सरासरी 74 हजार लिटर दूध संकलन होत आहे. दुधाचे दर 35 ते 36 रुपयांवर गेले होते. परंतु ते कोरोना काळात खाली आले. दुधावर अवलंबून असलेले व्यवसाय अडचणीत आल्याने त्याचे परिणाम स्वरूप दूध पुरवठा कोठे करायचा? हा मोठा प्रश्न निर्माण झाला. यातूनही आपण मार्ग काढला. संघाचा, शेतकर्यांचा तोटा होणार नाही याची सांगड घालत संचालक मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले. गत दीड वर्षापासून संघाने इतरांपेक्षा प्रतिलिटर दुधाला 1 रुपया जास्त भाव देवून सुमारे 2 कोटी 70 लाख रुपये शेतकर्यांना वाढीव दिले आहेत. कारण शेतकरी अडचणीत आहे. शेतीमालाला भाव नाही. कर्ज वाढत आहे, अशा परिस्थितीत शेतकरी जगला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभेच्या प्रारंभी संघाचे प्रभारी कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी नोटीसचे तसेच गतवर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचन केले. संचालक विठ्ठल चासकर यांनी प्रास्ताविक केले. तर या ऑनलाइन सभेत महेश नवले, राजेंद्र देशमुख, रामहरी तिकांडे, सुरेश नवले, प्रकाश देशमुख, संदीप भोर, गिरजाजी जाधव, सीताराम भांगरे आदिंनी सहभाग नोंदवत संघाच्या चांगल्या कामाचे अभिनंदन करीत काही मौलिक सूचना केल्या. विशेषतः 2 रुपये रिबेट द्यावा अशी मागणी केली. शेवटी संचालक भाऊपाटील नवले यांनी आभार मानले.