कोविडने घेतला सुकेवाडीतील तरुण पशूवैद्यकीय व्यावसायिकाचा बळी! लक्षणे नसल्याने डॉक्टरांनीही उपचार करतांना गांभीर्य पाळले नसल्याचीही जोरदार चर्चा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यावर पडलेली कोविडची वक्रदृष्टी कायम असून सोमवारीही तालुक्यातील आणखी एकाचा बळी गेला आहे. सदर इसमावर शहराच्या गावठाण भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र संबंधित डॉक्टरांना दाखल झालेल्या रुग्णाला कोविडची लागण झाल्याची बाब खुप उशीराने लक्षात आल्याची चर्चा आहे. त्यातून सदरचा रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचला आणि अखेर नाशिकमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. त्यामुळे या महिन्यात कोविडच्या संसर्गातून 18 वा बळी गेला असून शासकीय नोंदीनुसार आत्तापर्यंत तालुक्यातील 39 बाधितांचा मृत्यु झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्याची रुग्णसंख्या 3 हजार 138 वर जावून पोहोचली आहे.
या महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासूनच कोविडची दाहकता अधिक ठळकपणे समोर येवू लागली. सप्टेंबरमध्ये तालुक्याच्या ग्रामीणक्षेत्रात कोविडचे संक्रमण वाढण्यासोबतच कोविडची लागण होवून मृत्यु होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या शनिवारी (ता.26) निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय इसमाचा मृत्यु झाला, त्याच्या दुसर्याच दिवशी रविवारी हिवरगाव पठारावरील 70 वर्षीय इसमासह सायखिंडी येथील 40 वर्षीय तरुणाचा बळी गेला होता. या दोघांचीही परिस्थिती अत्यंत नाजूक बनल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
सध्या समोर येणारे बहुतेक रुग्ण कोणतीही लक्षणे नसलेली आहेत. त्यामुळे बहुतेकांच्या मनात ‘काहीच होत नाही’ असा गोड गैरसमजही निर्माण झाला आहे. मात्र तो साफ खोटा आणि आत्मघातकी असल्याचे सोमवारी समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्यासोबतच किरकोळ दुखणे आहे असे समजून अंगावरच काढण्याची सवय बदलण्याची गरज आहे. अन्यथा कोविडची दाहकता उशीराने समोर आलेल्या रुग्णाचा घास गिळण्यासाठी कोविडचे विषाणू अगदी तत्पर असल्याचेच यातून दिसून आले आहे.
सुकेवाडी येथील 27 वर्षीय पशूवैद्यकीय व्यावसायिक शहरातील गावठाणभागात असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती, मात्र किरकोळ ताप येवून गेला होता आणि थकवाही जाणवत होता. त्यामुळे भितीपोटी त्यांनी सदर रुग्णालयात धाव घेतली. मात्र संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनाही त्यांच्या दुखण्याचा अंदाज लावता आला नाही, त्यामुळे त्यांनी त्याची चाचणी करण्यास विलंब केल्याची चर्चा आहे. मात्र कोविडची लागण झाल्यानंतर सुरुवातीला त्याची लक्षणं दिसत नसली तरीही पाचव्या दिवसानंतर त्याची दाहकता समोर यायला सुरुवात होते. सदर तरुण पशूवैद्यकीय व्यावसायिकाच्या बाबतीतही हेच झाले.
सदर रुग्णालयात त्यांच्यावर अन्य आजारांवरील उपचारांचेच प्रयोग सुरु होते, त्यामुळे कोविडला वाढण्यास व पसरण्यास मोठा वाव मिळाल्याने सदर 27 वर्षीय तरुणाची अवस्था अधिक गंभीर होत गेली आणि अखेर गेल्या रविवारी (ता.27) त्याला तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांच्या माहितीनुसार कोविडची लागण झाल्यानंतर रुग्णासाठी पाचव्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत अधिक लक्ष देण्याची गरज असते, त्याकडे दुर्लक्ष झाल्यास रुग्ण दगावण्याची अधिक शक्यता असते. या तरुणालाही हाच अनुभव आला आणि दुर्दैवाने त्यातच त्याचा अंत झाला. आजवर संगमनेर तालुक्यात कोविडने 39 जणांचा बळी घेतला आहे, (अनधिकृत आकडा 43) मात्र आजवरच्या सर्व मृतांमध्ये सुकेवाडीतील तो तरुण सर्वात कमी वयाचा होता. त्याच्या अशा अकस्मात आणि दुर्दैवी जाण्याने संपूर्ण सुकेवाडीसह पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. सदर तरुण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर उपचार करणारे ‘ते’ डॉक्टरांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
28 दिवसांतला अठरावा बळी!
या महिन्यात आत्तापर्यंत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 1 हजार 418 रुग्णांची भर पडण्यासोबतच तालुक्यातील 18 जणांचे बळीही गेले आहेत. यात शहरीभागातील तिघांचा तर ग्रामीणभागातील 15 जणांचा समावेश आहे. गेल्या 1 सप्टेंबरपासून शहरातील माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, पंपींग स्टेशन परिसरातील 73 वर्षीय महिला व गांधी चौकातील 70 वर्षीय इसमाचा तर समनापूर येथील 62 वर्षीय इसम, मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय इसम, चिखली येथील 76 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, हिवरगाव पठार येथील 70 व 55 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 65 वर्षीय इसम, मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम, कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम, मनोली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय इसम व सायखिंडीतील 40 वर्षीय तरुण तर सुकेवाडीतील 27 वर्षीय पशूवैद्यकीय व्यावसायिकाचा समावेश आहे.
सोमवारी सोशल माध्यमांमधून सायखिंडीतील 51 वर्षीय इसमाचा ‘कोविड मृत्यू’ झाल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र सदर इसमाचा मृत्यू कोविडने झालाच नसून मृत्युच्यावेळी ते आपल्या सायखिंडीतील घरीच होते व या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती मिळाली आहे. सदर व्यक्तिच्या कोविड पॉझिटिव्ह असण्याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर इसमाची 21 सप्टेंबररोजी चाचणी करण्यात आली होती व ती निगेटिव्ह ठरल्याचीही माहिती मिळाली. या वृत्ताला संगमनेरचे इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनीही दुजोरा दिल्याने सोमवारी सोशल माध्यमात सायखिंडीतील 50 वर्षीय इसमाचा कोविड मृत्यू झाल्याची वार्ता अफवाच ठरली आहे.
कोविडने घेतला सर्वाधीक कमी वयाचा जीव!
संगमनेर तालुक्याच्या कोविड इतिहासातील पहिल्या बळीची नोंद 7 मे रोजी धांदरफळ बुद्रुक येथील 68 वर्षीय इसमाच्या रुपाने झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहर व ग्रामीणभागातील बाधितांचे बळी जात राहीले. आजवर कोविडने बळी गेलेल्यांचे वयोमान पहाता बहुतेक मृतांचे वय पन्नास वर्षांहून अधिक आहे. आजवर बळी गेलेल्या एकुण 43 जणांमध्ये 24 जूनरोजी राजवाडा (संगमनेर) येथील 38 वर्षीय महिला, 19 जुलैरोजी शिबलापूर येथील 43 वर्षीय व 25 जुलैरोजी कुरण मधील 45 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला होता. 31 ऑगस्टपर्यंतच्या एकुण 26 बळींमध्ये हे तिघे पन्नास वर्षांहून कमी वयाचे होते. तर याच महिन्यात 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुण छायाचित्रकार, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुण, 26 सप्टेंबररोजी सायखिंडी येथील 40 वर्षीय तर सोमवारी (ता.28) सुकेवाडीतील अवघ्या 27 वर्षांच्या तरुणाचा बळी घेत कोविडने आपली दहशत आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.