स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे युवाशक्तीला दिशादर्शक ध्रुवतारा ः जाखडी पुण्यतिथीनिमित्त संगमनेरात पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने अभिवादन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्वातंत्र्य चळवळीत लक्षावधी तरुणांना सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा देणारे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात हालअपेष्टा भोगणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे युवाशक्तीला दिशादर्शक अढळ ध्रुवतारा आहे. त्यांचे विचार चंद्र सूर्य असेपर्यंत नेहमीच जिवंत राहतील व येणार्या पिढ्यांना प्रखर देशभक्तीचे धडे देत राहतील, असे उद्गार पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी काढले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकातील सावरकर स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ब्रिटीश सरकारला आपल्या अलौकिक क्रांतीकार्याने ‘सळो की पळो’ करून सोडणार्या स्वातंत्रवीर सावरकरांचे अवघे जीवन म्हणजे भारतवर्षाला नेहमी प्रेरणा देत राहणारा प्रखर देशभक्तीचा प्रेरणादायी झरा आहे. तरुणांनी सावरकरांच्या मार्गाने जाण्याचा निर्धार केल्यास भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याचे कोणाचेही धाडस होणार नाही, असे परखड प्रतिपादन पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांनी केले. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ‘अभिनव भारत’ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी देशभक्त युवकांची फळी उभारली. त्यांच्या ओजस्वी व्याख्यानांनी आणि सडेतोड लिखाणाने ब्रितीशसत्तेला हादरवून टाकले. देशासाठी परिवाराची प्रचंड हानी तर सावरकरांनी सोसलीच परंतु काळ्या पाण्याची कठोर अमानवी शिक्षाही देशासाठी हसत हसत भोगली. अनेक महाकाव्ये आणि स्फूर्तीदायी ग्रंथ तसेच गीते, पोवाडे यांची रचना केली. अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांचे कर राष्ट्राला सावरण्यासाठी सतत कार्यरत राहिले ते अदभूत मूर्तीमंत देशभक्तीचे रूप म्हणजे सावरकर. क्रांतीकारकांचे मुकुटमणी ठरलेले सावरकर म्हणजे आपले राष्ट्र सर्वात श्रेष्ठ बनविणारी आणि कधीही न संपणारी समृध्द वैचारिक शिदोरी आहे, अशा शब्दांत जाखडी यांनी सावरकरांचे व्यक्तीमत्त्व शब्दांतून उभे केले.
पुरोहित संघाच्यावतीने जाखडी यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी संघाचे उपाध्यक्ष संदीप वैद्य, सतीश वैद्य, नंदुकाका जाखडी, अरुण कुलकर्णी, प्रतीक जोशी, रवी गुरुजी, मयूरेश कोथमिरे, विनोद लोंगाणी, दत्ता पावबाके, सुभाष कोथमिरे, विशाल बाळसराफ, श्याम महाराज, मिलिंद उपासनी, महेश मुळे, किरण जोशी, राजेंद्र क्षीरसागर, संजय डंबीर, सुधीर कुलकर्णी आदिंसह नागरिक उपस्थित होते.