श्रीरामपूर शहर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली चौघांना शिताफीने पकडले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील खंडाळा शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस श्रीरामपूर शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.

खंडाळा शिवारात यशवंत बाबा चौकीजवळ सराईत गुन्हेगार बाबर पठाण हा त्याच्या चार ते पाच साथीदारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांना कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सूरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल पटेल, पोलीस नाईक संतोष दरेकर, पोलीस शिपाई शिंदे, तुकाराम रोंगटे, प्रवीण क्षीरसागर यांच्यासह कर्मचारी खंडाळा शिवारातील यशवंत बाबा चौकीजवळ येथे गेले असता, पाचजण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. यावेळी पोलीस पथक त्यांच्या दिशेने जात असताना संशयिताना सुगावा लागल्याने ते पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी चौघांना शिताफीने पकडले. त्यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला परंतु तो मिळून आला नाही.

यावेळी पोलिसांनी बाबर जब्बार पठाण (वय 23), एक विधीसंघर्षित बालक, मुस्ताफ नूर शेख (वय 23, तिघेही रा. हुसैननगर, श्रीरामपूर) व अरबाज मस्तान शेख (वय 20, रा. जुने तहसील कार्यालयासमोर, श्रीरामपूर) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता बाबर पठाण याच्याकडे एक मोटारसायकल (क्र. एम.एच.17, सी.पी.9356) मिळून आली. विधीसंघर्षित बालकाच्या अंगझडतीत दोन्ही बाजूने टोकदार असलेली एक पिळदार लोखंडी गजाची कटावणी आणि प्लास्टिक पिशवीत 50 ग्रॅम मिरची मिळून आली. मुस्ताफ शेख याच्याकडे विनाक्रमांकाची मोटारसायकल आणि मोबाईल मिळून आला. तर अरबाज मस्तान शेख याच्या अंगझडतीत लोखंडी कत्ती असा एकूण 55 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई आदिनाथ माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 556/2022 भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे करीत आहेत. यातील बाबर पठाण व मुस्ताफ शेख यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
