‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानास संगमनेरात प्रारंभ

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानास संगमनेरात प्रारंभ
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अभियान ठरणार फायदेशीर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त संगमनेर तालुक्याकरिता राबविण्यात येणार्‍या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाचा प्रारंभ नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हस्ते मंगळवारी (ता.15) संगमनेर शहरात झाला.


शहरातील इंदिरानगर गल्ली क्रमांक दोनमध्ये या अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी गजेंद्र अभंग, मनीषा भळगट, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप, डॉक्टर पाचोरे, शकील बागवान, अमोल जंगम, विनायक वाडेकर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी सुरू केलेले ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान संगमनेर तालुक्यात सर्वप्रथम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुरू केले. याबाबत पदाधिकारी व प्रशासन अधिकार्‍यांची बैठक घेऊन हे अभियान सुरू करण्यास त्यांनी सूचवले होते. प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, नगरपालिका प्रभाग, ग्रामपंचायत प्रभाग, गावनिहाय पदाधिकार्‍यांनी प्रत्येक व्यक्तीस भेटून आरोग्य विषयाची माहिती देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार शहरात या अभियानाचा प्रारंभ झाला.


यावेळी नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या, संगमनेर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने सातत्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले आहे हे अत्यंत चिंताजनक आहे. घरगुती होणारे समारंभ व गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक नागरिकाला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा यासाठी त्या विभागातील प्रतिनिधीने प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून आरोग्याबाबतची माहिती द्यावी. तसेच काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर तहसीलदार निकम यांनी या अभियानाची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *