अगस्ति वाचवायचा की टोळीच्या ताब्यात द्यायचा? माजी मंत्री मधुकर पिचड यांचा राजूर येथील बैठकीत सवाल

नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ‘अगस्ति’ची निर्मिती केली. तुम्ही म्हणत असाल तर मी नेतृत्व करण्यास तयार आहे. अगस्ति वाचवायचा, की टोळीच्या ताब्यात द्यायचा? मी अर्ज भरला आहे तो ठेवायचा का नाही, हे तुम्हीच सांगा. आदिवासींना साखर दिली नाही म्हणणारे ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात, त्यांना का विचारत नाही, असा सवाल भांगरे यांचे नाव न घेता माजी मंत्री मधुकर पिचड यांनी उपस्थित केला.

राजूर येथे आदिवासी भागातील कार्यकर्ते, ऊस उत्पादक, अनुत्पादक शेतकर्यांची सोमवारी (ता.27) बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, सी. बी. भांगरे, उपसभापती दत्ता देशमुख, गणपत भांगरे, विजय भांगरे, पांडुरंग भांगरे, जयराम इदे, पांडुरंग खाडे, सुरेश भांगरे, श्रावण भांगरे, रामनाथ भांगरे, तुकाराम खाडे, गणपत देशमुख, संपत झडे, दगडू पांढरे, बुधा पांढरे, पांडुरंग पाटील उपस्थित होते.

माजी मंत्री पिचड म्हणाले, की गेली चाळीस वर्षे काय केले? असे विचारले जाते. अगस्ति कारखान्याची निर्मिती करून यशस्वीरीत्या चालविला. आज जे विरोधक आहेत, त्यांना पदे देऊन मोठे केले. मुलाला बाजूला सारत त्यांना सन्मान दिला. मात्र, आज चाळीस वर्षांत काय केले म्हणतात. कृषी उत्पन्न, खरेदी-विक्री संघ, अमृतसागर दूध संस्था उभारून सहकारी संस्थांना बळकटी दिली. या निवडणुकीत तालुक्याची, ऊस उत्पादक व अनुउत्पादक शेतकरी यांची परीक्षा आहे. कारखाना अडचणीत असून, केंद्र सरकारच्या मदतीने निश्चितच अगस्ती ऊर्जितावस्थेत आणू. माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, की तालुक्यात जलसिंचन प्रकल्प हाती घेऊन त्याद्वारे शेतकर्यांच्या शेतीला पाणी देऊन ऊस उत्पादक शेतकरी बनविले. केवळ वैयक्तिक लाभासाठी डाव्या-उजव्या बाजूला बसणारे पुढारी पळाले. आज तेच लोक साहेबांना आव्हान देत आहेत. गणपत भांगरे यांनी प्रास्ताविक केले. आभार विजय भांगरे यांनी मानले.

लहामटे मुर्मू यांना मत देणार का?
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला बसणार आहे. तालुक्याच्या आमदाराला विचारा, की पक्षाला महत्त्व देणार की आदिवासी समाजाच्या महिलेस मतदान करणार, असेही माजी मंत्री पिचड म्हणाले.
