जुन्या शहराचा गावठाण भाग सामावणार आता एकाच नजरेत! नामदार थोरात यांचा विकास निधी; शंभर किमीहून अधिक वेगाचे वाहनही सुटणार नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील वाढती रहदारी, उद्योग-व्यवसाय, बँकांची संख्या व त्यासोबतच वाढत असलेली गुन्हेगारी आणि अन्य घटना वेळीच रोखता याव्यात यासाठी एकाच नजरेत शहराला सामावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून संगमनेर नगरपरिषदेने हा महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेतला असून पहिल्या टप्प्यात जुन्या शहरासह बसस्थानकापर्यंतचा परिसर एका नजरेत घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील बारा चौकांमध्ये उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असलेले 39 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. त्यात तीन कॅमेरे ‘पी.टी.झेड’ तंत्रज्ञानाचे असून त्याद्वारे ताशी शंभर किलोमीटर वेगाहून अधिक गतिमान असलेल्या वाहनाच्या सुस्पष्ट क्रमांकासह वाहनातील व्यक्तिंचे चेहरेही पाहता येतील. सुमारे पंधरा लाख रुपये खर्चाचा हा उपक्रम मार्चअखेर पूर्ण करण्याचे बंधन असले तरीही तत्पूर्वीच ते कार्यान्वित होणार आहेत.

चार वर्षांपूर्वी राजस्थान युवक मंडळासह शहरातील काही सामाजिक संस्थांच्या मदतीने तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना प्रत्यक्षात उतरविली होती. या उपक्रमातून मेनरोड ते तीनबत्ती चौकापर्यंतच्या परिसरात होणार्या विविध घटनांवर पोलिसांचे लक्ष राहील असे अपेक्षित होते. लोकसहभागातून उभ्या केल्या गेलेल्या या यंत्रणेचा सुरुवातीला काही प्रमाणात पोलिसांना फायदाही झाला, मात्र नंतरच्या काळात या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे सुरुवातीला तिसर्या डोळ्यात सामावलेल्या तीनबत्ती चौक ते महात्मा फुले चौकापर्यंतच्या परिसरातील अनेक कॅमेरे बंद पडल्याने महत्त्वाची असूनही ही यंत्रणा कुचकामी ठरली.

आता शहर आणि नागरिक यांच्या सुरक्षिततेसाठी संगमनेर नगरपरिषदेनेच पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राज्याचे महसूल मंत्री व संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीचा वापर करण्यात आला असून 14 लाख 93 हजार रुपये खर्च करुन या महत्त्वकांक्षी उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी यासाठी गुन्हेगारी घटना घडलेल्या, घडू शकणार्या अथवा गुन्हेगार पळून जाण्याचा प्रयत्न करतील अशा शहरातंर्गत रस्त्यांचा अभ्यास करुन त्यातील बारा ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यातून या उपक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार असून पुणे-नाशिक महामार्गासह शहराच्या उपनगरांमध्ये दुसर्या टप्प्यात ही योजना राबविली जाणार आहे.

जुन्या शहराच्या पश्चिमेकडील महात्मा फुले चौक, साईनाथ चौक, मोमीनपुरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक (अरगडे गल्ली), बसस्थानकाचा चौक, नवीन नगर रस्ता, हॉटेल काश्मिर, गवंडीपुरा मशिदीचा चौक, सय्यदबाबा चौक, तीनबत्ती, तेली खुंट आणि नेहरु चौक अशा एकूण बारा ठिकाणी उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले आणि 50 ते 60 मीटर अंतरावरील चित्र सुस्पष्टपणे टिपणारेे एकूण 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. फोर-के या डिजिटल श्रेणीतील हे सर्व कॅमेरे रात्रीही चांगल्या दर्जाचे चित्रिकरण करु शकतात अशा क्षमतेचे आहेत. याशिवाय महत्त्वाच्या तीन ठिकाणी पी. टी. झेड (पॅन टिल्ट झूम) श्रेणीतील तीन अतिरीक्त कॅमेरेही बसविले जात असून या कॅमेर्यांचा वापर महामार्ग पोलिसांकडून भरधाव वेगाने धावणार्या वाहनांवरील कारवाई करण्यासाठी होत असतो.

अतिशय उच्च दर्जाचे हे कॅमेरे 360 डिग्रीत छायाचित्रण करण्यासह सुमारे सहाशे मीटरहून अधिक (अर्धा किलोमीटर) अंतरावरील शंभराहून अधिक किलोमीटर ताशी वेग असलेल्या वाहनाचा केवळ क्रमांकच नव्हेतर वाहनात बसलेल्या व्यक्तीचे चेहरेही ठळकपणे दाखवतात. याशिवाय सदर तीन कॅमेरे स्वयंचलीत असून परिस्थितीनुरुप ते स्वतःच आपल्यात बदल घडवून हवे त्या लक्ष्यावर केंद्रीत होतात. दूर नियंत्रण कक्षात बसलेली व्यक्तिही आपल्या जागेवरुनच या कॅमेरांना हव्या त्या दिशेला फिरवू शकतात अथवा हवे त्या लक्ष्यावर दीर्घकाळ स्थिरावू शकतात. यासाठी फायबर ऑप्टिकल वायरचा वापर करण्यात आला असून जुन्या पद्धतीची ‘डीव्हीआर’ पद्धतही यातून नाहीसी होणार आहे.

या सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नियंत्रण संगमनेर शहर पोलीस ठाण्यात असणार आहे. त्यासाठी नव्याने सुसज्ज नियंत्रण कक्षाचीही उभारणी करण्यात येत असून एकाचवेळी 39 कॅमेर्यांमधून थेट प्रक्षेपण दिसण्याची व्यवस्था केली जात आहे. या सर्व ठिकाणांवरुन दिसणारे चित्रीकरण पोलीस ठाण्यातील एकमेव डिव्हीआरमध्ये सुरक्षित केले जाणार आहे. सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करुन उभ्या राहत असलेल्या या संपूर्ण यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची एका वर्षाची जबाबदारी ठेकेदाराची असल्याने पुढील काही वर्ष ही यंत्रणा सक्षमपणे आपली भूमिका बजावेल असा पालिका व पोलिसांना विश्वास आहे.

या यंत्रणेच्या माध्यमातून शहरात घडणार्या सोनसाखळी अथवा रोकड लांबविण्याच्या घटना, मोटारसायकल चोरीच्या घटना, छोट्या-मोठ्या चोर्या, गुन्हेगारी प्रवृत्तींच्या हालचाली यावर नियंत्रण मिळविण्यासह शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्यां घटनांवर एकाच नजरेतून पोलिसांना लक्ष्य देता येणं शक्य होणार आहे. हा महत्त्वकांक्षी उपक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला मार्च अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, मात्र तत्पूर्वीच त्याने शहरातील वरील बाराही ठिकाणी फायबर ऑप्टिकल वायरींगचे कामही पूर्ण झाले असून बहुतेक ठिकाणी कॅमेरेही बसविले गेल्याने येत्या काही दिवसांतच ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. सध्या पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

वाढत्या लोकसंख्येचा परिणाम गुन्हेगारी घटना वाढण्यात होत असतो. पोलीस यंत्रणा अशा सर्वच ठिकाणी पोहोचून या घटनांना पायबंद घालू शकत नाहीत. त्यासाठी आज सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक बनले आहेत. पालिकेने हाती घेतलेल्या या महत्त्वकांक्षी उपक्रमातून शहरातील बारा चौक आणि रस्ते सुरक्षित झाले आहेत. त्यासाठी 36 कॅमेरे फोर-के श्रेणीतील तर तीन कॅमेरे पी. टी. झेड श्रेणीतील वापरण्यात आले आहेत. अशा कॅमेर्यांचा वापर महामार्गावरील ‘स्पीड गन’साठी केला जात असतो. त्यामुळे पालिकेचा हा नवीन उपक्रम पोलिसांचे काम हलके करण्यासह नागरिकांच्या मनात निर्भयी वातावरण निर्माण करणारा ठरणार आहे.

