पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या वाढदिवस करण्यास मनाई! नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांचे आदेश


नायक वृत्तसेवा, नगर
वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच साजरा करावा, असा आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी दिला आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना हा आदेश देण्यात आला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

काही अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाण्यांमध्ये वा कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरुपांमध्ये साजरे करीत आहेत. हे वाढदिवस साजरे करताना बर्‍याचवेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्ती, दारु, मटका व इतर अवैध धंदा करणारे, पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी झालेले दिसून आले आहेत. त्याचप्रमाणे वाढदिवस साजरा करताना पोलीस ठाण्यामध्ये किंवा कार्यालयात मोठ्या आवाजामध्ये लाऊड स्पीकर लावून त्यावर नाचले जात आहे. या प्रकाराचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा डागाळली जावून समाजामध्ये एक वेगळाच संदेश जात आहे. त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रतिकूल व वाईट मत तयार होत आहे.

आपला वाढदिवस साजरा करणे ही वैयक्तिक बाब असून अधिकारी व अंमलदार यांनी वैयक्तिक स्तरावर आपले वाढदिवस साजरे करणे आवश्यक आहे. यापुढे पोलीस ठाणे आवारात किंवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरे करण्यात येवू नयेत. पोलीस अधीक्षकांनी याबाबत अखत्यारीतील सर्व अधिकारी व अंमलदार यांना लेखी स्वरुपात सूचना देवून यापुढे आपल्या जिल्ह्यातील पोलीस ठाणे अथवा कार्यालयात कोणाचेही वाढदिवस सार्वजनिक स्वरुपात साजरे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा पूर्तता अहवाल दहा दिवसांत सादर करावा, असेही डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

Visits: 19 Today: 1 Total: 115943

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *