संगमनेरच्या ‘वैभवशाली’ बसस्थानकाला समस्यांचे ‘ग्रहण’! अनेक महिन्यांपासून आगारप्रमुखच नाहीत; अस्वच्छता आणि अंधाराने वास्तू काळवंडली
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन उभ्या राहिलेल्या संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकाला आता वेगवेगळ्या समस्यांचे ग्रहण लागले आहे. स्थानकाच्या बाह्य बाजूला दोन्हींकडील व्यापारी गाळ्यांच्या समोरील बाजूस दिवसरात्र बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने, या परिसरात असंख्य भिक्षेकर्यांचा वावर, जागोजागी कचरा आणि घाणीचे आगार असूनही स्वच्छतेसाठी अपूर्ण मनुष्यबळ आणि मुख्य प्रवेशद्वारासह स्थानकाच्या विस्तीर्ण परिसरातील अंधार यामुळे जिल्ह्यात सर्वात देखण्या ठरलेल्या संगमनेर बसस्थानकाची वास्तु काळवंडली आहे. साहजिकच त्याचा परिणाम लाखो रुपये खर्च करुन स्थानकाच्या संकुलात व्यापारी गाळे घेणार्यांच्या व्यवसायावरही होत असून या गोष्टी सुधारण्याची गरज त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
राज्याचे महसूल मंत्री व संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या संगमनेर बसस्थानकाने जिल्ह्यातील सर्वात देखण्या बसस्थानकाचा मान मिळवला आहे. अंतर्गत बाजूस विस्तीर्ण फलाटं, वाहनांना वळवण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा, तांत्रिक विभागाचा विस्तीर्ण परिसर, वाहने दुरुस्तीची कार्यशाळा, डिझेल पंप, वाहनांच्या मुख्य प्रवेशद्वारालगत दत्तात्रयांचे देखणे आणि सुबक मंदिर, बाह्य बाजूला दुमजली व्यापारी संकुल व त्यात थाटलेले विविध व्यवसाय, महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेसह येथील बाजारपेठेमुळे नागरिकांची वर्दळ या सर्व गोष्टींमुळे संगमनेरच्या बसस्थानकाच्या लौकीकात मोठी भर पडलेली असतांना मानव निर्मित व मानवी दुर्लक्षामुळे या वैभवशाली वास्तूच्या सौंदर्याला मात्र डाग लागत आहे.
दोन्ही बाजूंना असलेल्या व्यापारी संकुलांचा परिसर मोठा असल्याने व राज्य परिवहन महामंडळाने ही वास्तू उभी राहताना तिच्या स्वच्छतेचा विचारच न केल्याने सर्वत्र कचरा आणि घाण नजरेस पडते. त्यासोबतच या व्यापारी संकुलाची उभारणी करतांना येणार्या ग्राहकांसाठी वाहने उभी करण्याची मुबलक जागा असावी हा हेतू ठेवण्यात आला होता. मात्र हा हेतूच येथील व्यापारी वर्गासाठी आता डोकेदुखी ठरु लागला आहे. ज्यांना संगमनेरच्या बसस्थानकात जायचेही नाही किंवा तेथील व्यापारी संकुलातू काही घ्यायचेही नाही अशी मंडळी आपली चारचाकी व दोनचाकी वाहने बिनधास्त आणि मनमानीपणे उभी करुन दिवसभर गायब होते. त्याचा परिणाम या संकुलामध्ये जाणार्या ग्राहकांना सहन करावा लागत असल्याने अनेकजण बसस्थानकातील व्यापारी संकुलात जाण्याचे टाळू लागले आहे.
खरेतर येथील वाहनतळ सशुल्क असावे असाही विचार मध्यंतरी आला होता, मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने बसस्थानकाबाहेरील बाजूस दिवसभर बेशिस्त वाहनांचे प्रदर्शन आता संगमनेरकरांसाठी नित्याचे ठरले आहे. या वाहनांच्या दाटीत घाणही साचत असल्याने व ती स्वच्छ करण्याची कोणतीही यंत्रणा अथवा मनुष्यबळ संगमनेर आगाराकडे नसल्याने बेशिस्तीत घाणीचीही भर पडली आहे. त्यातच गेल्या अनेक महिन्यांपासून संगमनेर आगाराला व्यवस्थापकच नसल्याने सध्यातरी या सर्व समस्यांना कोणीच वाली नसल्यागत स्थिती आहे.
चंदुकाका सराफ यांच्या दालनाकडून प्रवाशांना बसस्थानकात जाता येते. त्यासाठी आकर्षक रचना असलेले मुख्य प्रवेशद्वार व त्यावर संगमनेर बसस्थानक असे लिहिले गेले आहे. मात्र सुरुवातीचा कालावधी सोडता गेल्या मोठ्या काळापासून या प्रवेशद्वारातील दिवे कधीही चालू असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे चक्क बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातच नेहमी अंधाराचे साम्राज्य असते. याबाबतही संकुलातील व्यापारी व प्रवाशांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्याची दखल घ्यायलाच कोणी नसल्याने आहे ती स्थिती आणखी खालावत आहे.
केवळ भव्य आणि आकर्षक इमारती उभ्या राहिल्या म्हणजे शहराचे सौंदर्य वाढत नाही तर त्या इमारतींची त्या पद्धतीने देखभालही आवश्यक असल्याने या सर्व गोष्टींकडे संगमनेर आगाराच्या अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र दुर्दैवाने यातील कोणत्याही गोष्टी घडत नसल्याने दिवसोंदिवस संगमनेर बसस्थानक म्हणजे हक्काचा निवारा असे मानून येथे कायमस्वरुपी तळ ठोकणार्या भिक्षेकर्यांच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. या सर्व गोष्टींची संगमनेरच्या राजकीय नेतृत्त्वाने दखल घेवून आवश्यक ते बदल करण्याची गरजही आहे आणि तशी मागणीही येथील व्यापारी वर्गासह नियमित बसचा वापर करणार्या प्रवाशांनी केली आहे.