अकोले नाक्याचा परिसर बनतोय गुन्हेगारांचे आश्रयस्थान! म्हाळुंगीतील वसाहतीत गुन्हेगारी टोळ्या; दररोजच्या घटनांनी नागरिक त्रस्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘सुसंस्कृत’ आणि ‘शांत’ शहर अशी ओळख असलेल्या संगमनेर शहराच्या शांततेला आता निष्क्रिय पोलिसांमूळे गालबोट लागत आहे. त्यातून संगमनेरचे पश्‍चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोले नाका रस्त्यावर गुन्हेगारी टोळ्यांनी बस्तान बांधले असून चोर्‍या, घरफोड्या, लुटमारी आणि अवैध व्यवसायांसह त्यांच्याकडून आता जीवघेणे हल्लेही सुरु झाले आहेत. गेल्याकाही वर्षात चक्क म्हाळुंगी नदीच्या पात्रात भर घालून निर्माण झालेल्या मानवी वस्त्यांमध्ये अज्ञात ठिकाणांहून आलेल्या विविध गुन्हेगारांनीही हक्काचे इमले उभारले आहेत. त्यामुळे कधीकाळी संगमनेरच्या ग्रामीणभागाला संपन्न करणार्‍या म्हाळुंगीचाच गळा घोटला जात असून सततच्या गुन्हेगारी वावराने हा परिसर कुख्यात गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनला आहे. मागील काही दिवसांपासून म्हाळुंगी नदीच्या पात्रातील गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये अंतर्गत कलह सुरु असून त्यातूनच शुक्रवारी तिघांना बेदम मारहाण करण्यात आली व त्यांची मोपेडही पेटवून देण्यात आली होती. मात्र या धक्कादायक प्रकारानंतरही पोलीस येथील गुन्हेगारांवर कायद्याची ‘जरब’ बसवण्यात सपशेल अपयशीच ठरल्याने हा परिसर सामान्य नागरिकांसाठी आता धोकादायक ठरु लागला आहे.


संगमनेर शहराभोवती गतीने वाढणारी अतिक्रमणं आणि शासकीय जागांवर गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व यातून शहरातील गुन्हेगारी घटनांचा आलेख एकसारखा उंचावत आहे. त्यातही तालुक्यातील ग्रामीणभागासह अकोले तालुक्याला संगमनेरशी जोडणार्‍या मुख्य रस्त्यावरील अकोले नाक्याचा परिसर तर सामान्य माणसांच्या मनात धडकी भरावी अशा घटनांनी सतत चर्चेत येत आहे. या परिसरातून अकोले आणि राजापूरकडे जाणार्‍या महत्त्वाच्या रस्त्यावर दुतर्फा अनेकांनी चक्क म्हाळुंगी नदीच्या पात्रातच मोठी भर घालून वसाहती उभारल्या आहेत. या वसाहतींमध्ये राहणारी मंडळी कोण आहे?, ती कोठून आली आहे?, त्यांचे येथे येण्याचे प्रयोजन काय? याची उत्तरे शोधण्याचाही कधी प्रयत्न झाल्याचे ऐकिवात नाही.


त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांसाठी अतिशय सुरक्षित झाला असून आता त्यांची संख्याही वाढल्याने त्यातून त्यांची गुन्हेगारी कृत्य वाढीस लागली आहेत. शुक्रवारी संगमनेर खुर्द परिसरात राहणारे अश्पाक सलीम शेख, अजहर सलीम शेख व शोएब शेख हे तिघे त्यांच्या मोपेडवरुन जात असताना म्हाळुंगीच्या पात्रात इमले बांधून राहणार्‍या आरिफ शेख, फरदीन शेख, शरिफ शेख, अश्पाक शेख व नवशाद शेख या पाचजणांनी त्यांना अडवून ‘तुम इधर कायको आये..’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ऐनवर्दळीच्या वेळी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अकोले रस्त्यावरील राजपाल किराणा शांपीजवळ घडलेला हा प्रकार पोलिसांना कळवूनही त्यांच्याकडून तत्काळ कोणतीही कारवाई झाली नाही.

त्याचा परिणाम सुरुवातीला काहीवेळ गुंडांच्या या टोळीने मोपेडवरील ‘त्या’ तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर काही वेळाने आरोपी नवशाद शेख याने पळत जावून लोखंडी रॉड आणला आणि त्याच्या सहाय्याने तिघांनाही गंभीर दुखापती केल्या. या गदारोळवेळी येथील बेकायदा वसाहतींमधील दोनशे ते अडिचशे जणांचा मोठा जमाव गोळा झाल्याने या परिसरात राहणार्‍या सामान्य नागरिकांचे अक्षरशः धाबे दणाणले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर तेथील गुंडांनी या घटनेनंतरही आपली दहशत निर्माण करण्यासाठी मारहाण केलेल्या तरुणांची मोपेड राजपाल किराणा शॉपीजवळ पेटवून दिली. यानंतर काही वेळाने आणखी एक दुचाकीही त्याच आगीच्या ज्वाळांमध्ये स्वाहा केली गेली, मात्र काही वेळातच त्यातील काही गुंडांनी नंतर आणलेली दुचाकी जाळातून काढून अन्यत्र नेली.


याप्रकरणी जखमी असलेल्या अश्पाक शेख याने दिलेल्या जवाबावरुन वरील पाचजणांवर हत्याराच्या सहाय्याने बेदम मारहाण करण्यासह दंगलीचा गुन्हा दाखल केला. यावेळी जळीत झालेल्या दुचाकीचा पंचनामाही पोलिसांनी केला आणि त्यावर परिसरातील दोघा व्यावसायिकांच्या साक्षीदार म्हणून सह्याही घेतल्या. कहर म्हणजे या भागातून पोलिसांनी पाठ फिरवताच दहशत माजवणार्‍या टोळक्याने पोलिसांच्या पंचनाम्यावर सह्या करणार्‍या ‘त्या’ व्यावसायिकांनाही धाकात घेतले, यावरुन येथील गुन्हेगारांच्या दहशतीचा सहज अंदाज बांधला जावू शकतो.


वास्तविक मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाने राजापूरकडे जाणार्‍या रस्त्यावरील त्यांच्या हद्दित येणारी बहुतेक अतिक्रमणं हटवली होती. त्याचवेळी पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या म्हाळुंगी नदीपात्रातील बेकायदा वसाहतींचा विषयही समोर आला होता. येथील अतिक्रमणं हटवताना सार्वजनिक बांधकाम विभागासह पाटबंधारे खात्यानेही अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या होत्या. त्यामुळे मिळालेल्या पोलीस बंदोबस्तासह म्हाळुंगीतील अतिक्रमणंही काढली जाणं अपेक्षित असताना ‘त्या’ विभागाने मात्र कच खाल्ली आणि त्यामुळे येथील वसाहती आजही कायम आहेत.


येथील म्हाळुंगीच्या पात्रात निर्माण झालेल्या बेकायदा नागरी वस्त्यांमध्ये निराधारांसह गाढवांद्वारा वाळूचोरी करणार्‍या तस्करांच्या टोळ्या, खिसे कापणारे व नागरिकांचे मोबाईल पळविणारे चोरटे, परिसरात वाटमार्‍या करणारे गुंड, शेतकर्‍यांसह मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या आणि वायरी चोरणार्‍या टोळ्यांही आनंदाने नांदत असून त्यांना पोलीस अथवा कायदा यांचा कोणताही धाक नसल्याने वेळोवेळी सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे या परिसरात भंगाराचा व्यापार करणारेही काहीजण असून त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी काही वेळातच संपूर्ण खोलून मोकळ्या जातात अशीही चर्चा आहे. शिवाय सध्या या परिसरात एका तडीपार गुंडांचीही मोठी दहशत असल्याचे बोलले जात असून जिल्ह्यातून तडीपार असलेला गुंड घरातच कसा? असाही सवाल उपस्थित होत आहे.


नद्यांच्या पात्रात भर घालून निर्माण होणार्‍या मानवी वसाहतींमूळे भविष्यात आसपासच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या घरांची सुरक्षा ही धोक्यात आली आहे. शिवाय या बेकायदा वसाहतींमध्ये अनेक गुन्हेगारांचाही आता शिरकाव झाल्याने व त्यांच्याकडून वेगवेगळी गुन्हेगारी कृत्य घडत असल्याने रात्री दहानंतर अकोले अथवा राजापूरकडे जाताना सर्वसामान्य माणसांच्या मनात धडकी भरत आहे. सुसंस्कृत आणि शांत शहर म्हणून ओळख असलेल्या संगमनेरच्या प्रकृतीला हे अजिबातच पोषक नसल्याने संबंधितांनी या गोष्टींकडे प्रामाणिकपणे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Visits: 138 Today: 2 Total: 1099674

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *