‘भंडारदरा’ धरण शंभर टक्के भरले…!
‘भंडारदरा’ धरण शंभर टक्के भरले…!
816 क्युसेक्सने प्रवरा नदीपात्रात विसर्ग तर निळवंडेत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक
नायक वृत्तसेवा, अकोले
यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने सर्वांचे अंदाज वार्यात गोलगोल उडविल्याने समाधानकारक पावसाबाबत चिंता निर्माण झाली होती. परंतु, वादळानंतर वरुणराजाने सर्वदूर जोरदार हजेरी लावत बळीराजाला सुखद धक्का दिला. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडल्याने प्रवरा व मुळा खोर्यातील पाण्याचे स्त्रोत ओसंडून वाहू लागले. यामुळे मोठ्या प्रमाणात भंडारदरा व मुळा धरणात पाण्याची आवक झाल्याने धरणांची पाणी पातळी सातत्याने उंचावत राहिली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असला तरी जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा धरण आज (बुधवार ता.26) सकाळी पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरल्याने लाभधारकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

11 दलघफूट क्षमता असणारे भंडारदरा धरण स्वातंत्र्य दिनी भरण्याची परंपरा आहे. परंतु यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने परंपरा खंडीत झाली. पावसाचे आगार समजले जाणारे घाटघर, रतनवाडी, उडदावणे, पांजरे, वाकी, भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई पाणलोट क्षेत्रात हंगामाच्या सुरुवातीच्या काळात काहीसा कमी जोर होता. त्यात निसर्ग चक्रीवादळाने आणखी फटका बसला. त्यानंतर मात्र मान्सूनने पाणलोट क्षेत्रात जोर पकडल्याने डोंगरदर्यातील स्त्रोत हळूहळू भरु लागले. आदिवासी भात उत्पादकही भात आवणी करावी की नाही या पेचात पडले होते. परंतु ऑगस्ट महिन्यात कोसळधारांनी फेर धरल्याने आदिवासी शेतकर्यांनी भात आवणीला वेग दिला. त्यांचे अर्थकारणही या पिकावरच अवलंबून असल्याने मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. येथील भूभागही खडकाळ असल्याने पाण्याचा निचरा पटकन होत असल्याने सातत्याने भात पिकासाठी आवश्यक असल्याने भात उत्पादक वरुणराजाकडे डोळे लावून बसत होते.

मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा पाणलोट क्षेत्रात जोरदार बॅटींग केल्याने धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. आज सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणात 149 दघलफूट पाण्याची आवक झाल्याने पाणीसाठा 11 हजार दलघफूट झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरल्याचे पाटंबधारे विभागाने घोषित केले. सध्या धरणातून प्रवरा नदीपात्रात 816 क्युसेक्सने विसर्ग चालू आहे. तर निळवंडे धरणातही प्रवरा नदीसह जवळपास असणार्या दर्याखोर्यांतून पाणी वाहून आल्याने पाणीसाठा 7 हजार 492 दलघफूट झाला आहे. भंडारदरा धरणातून गेल्या 24 तासांत 71 दलघफूट पाणी आले असून 263 दलघफूट क्षमतेने आवक सुरू आहे. दरम्यान, निळवंडे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाटबंधारे आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या असून, धरणातून प्रवरा नदीपात्रात 710 क्युसेक्स क्षमतेने विसर्ग चालू आहे. 112.66 दलघफूट क्षमता असणारा वाकी जलाशयही पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडला आहे. या जलाशयातून तब्बल 1022 दलघफूट क्षमतेचा ओव्हरफ्लोचा विसर्ग सुरू आहे. पूर्वेकडे असणारे 1060 दलघफूट क्षमतेचा आढळा मध्यम प्रकल्पही ओसंडला असून धरणातून आढळा नदीपात्रात 364 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. यामुळे आढळा लाभक्षेत्रातील छोटे-मोठे केटीवेअर आणि ओढे-नालेही ओसंडून वाहू लागल्याने शेतकर्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या 24 तासांत बरसलेला पाऊस (सर्व आकडे मिलीमीटरमध्ये)
घाटघर 65, रतनवाडी 31, पांजरे 27, वाकी 22, भंडारदरा 25, निळवंडे 13, आढळा 02.

धरण पाणीसाठा (सर्व आकडे दलघफूटमध्ये)
भंडारदरा 11,000 (99.64 टक्के), निळवंडे 7,492 (89.96 टक्के), मुळा 23,701 (91.16 टक्के), आढळा 1060 (100 टक्के), भोजापूर 361 (100 टक्के).
