संतप्त ब्राह्मणवाडा ग्रामस्थांचा महावितरण विरोधात रास्ता रोको! उपकार्यकारी अभियंत्यांवर कारवाईची मागणी; शुक्रवारीही करणार उपोषण

नायक वृत्तसेवा, अकोले
ऐन पावसाळ्यात ब्राह्मणवाडा (ता.अकोले) गावाला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. महावितरणने पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा खंडीत केल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी निवेदनातून गुरुवारी (ता.23) रास्ता रोकोचा इशारा दिला होता. परंतु, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने ग्रामस्थांनी सकाळी 9 वाजता रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.

गेल्या मार्च महिन्यात थकीत वीजबिलापोटी ब्राम्हणवाडा गावाला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेची वीज खंडीत करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामपंचायत आणि संतप्त ग्रामस्थांनी महावितरणला टाळे टोकले होते. मात्र, महावितरणकडे ग्रामपंचायतचे थकीत वीजबिल सव्वा कोटी रुपये असतानाही त्यांनी वीज पुरवठा खंडीत केला आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतने सुमारे सहा लाख रुपयांचा भरणा महावितरणला केला आहे. तरी देखील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतने न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान, प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतसह ग्रामस्थांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षकांना 20 जूनला निवेदन दिले होते. त्यात रास्ता रोकोचा इशाराही दिलेला होता. परंतु, कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने सरपंच संतोष भांगरे, उपसरपंच सुभाष गायकर, सदस्य रवींद्र हांडे, शिवाजी आरोटे, सागर गायकर, संजय गायकर यांच्यासह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.


ब्राह्मणवाडा गावाला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेचा वीज पुरवठा खंडीत करण्याबरोबर पथदिव्यांचाही वीज पुरवठा महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता खंडीत केला आहे. त्यामुळे राजूरच्या उपकार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करावी. याशिवाय शुक्रवारी (ता.24) ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचाही इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Visits: 122 Today: 1 Total: 1415835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *