भंडारदर्याच्या काजवा महोत्सवाला यंदा अवकाळीचा तडाखा! काजवाप्रेमी पर्यंटकांचा झालाय हिरमोड; सलगच्या पावसाने प्रजननातच अडथळे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पावसाच्या प्रतिक्षेत धरणीचा ताप वाढलेला असतानाही दरवर्षी भंडारदरा धरणाच्या परिसरात पर्यटकांची मोठी रेलचेल असते. त्यामागे कारण असते मान्सूनच्या आगमनापूर्वी या भागात रंगणारा प्रकाशोत्सव. वळवाच्या एखाद्या सरीनंतर निर्माण होणार्या वातावरणात कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या अभयारण्यात काजवे चमकू लागतात. जमिनीवर आणि पानाफुलांवर रेंगणार्या माद्यांना आकर्षित करण्यासाठी हजारों-लाखों चमचमणारे जीव समूहाने जेव्हा एका या झाडावरुन त्या झाडावर जातात त्यावेळी हा अनुभव साक्षात तारांगण भूईवर अवतरल्याचा आभास निर्माण करणाराच असतो. त्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपर्यातून हजारों पर्यटक भंडारदर्याच्या परिसरात दाटी करतात. यंदा मात्र सलग सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेतच अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे या परिसरात अद्यापपर्यंत काजव्यांचे दर्शनच घडत नसल्याने पर्यटकांचा मोठा हिरमोड होत असून त्यांना निराश मनाने माघारी परतावे लागत आहे. त्यातच अवकाळीचा मुक्काम वाढून यंदा वेळेपूर्वीच राज्यात मान्सूनही दाखल झाल्याने यावेळच्या काजवा महोत्सवाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर. सह्याद्रीच्या कणखर रांगेत सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभा राहीलेला भंडारदरा जलाशय, रतनगड, हरिश्चंद्रगड, अलंग-कलुंग-मदन, शिखरस्वामीनी कळसूबाई, पाचपट्टा अशा कितीतरी छोट्या-मोठ्या दुर्गांनी समृद्ध असलेला हा तालुका पावसाळ्यात आपले रुपडेच पालटतो. या संपूर्ण परिसराला विपूल प्रमाणात वृक्षसंपदाही लाभली आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर तर निसर्ग भटक्यांसाठी सदैव आकर्षणाचे केंद्रच राहीला आहे. त्यामुळेच पावसाळ्यातील चार महिने आणि त्यानंतरचा मोठाकाळ या परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ बघायला मिळते. त्या माध्यमातून आदिवासीबहुल आणि दुर्गम असलेल्या या भागातील अर्थचक्रालाही गती प्राप्त होते.

ग्रीष्मऋतू संपण्याचा कालावधी म्हणजे भंडारदरा धरणाच्या परिसरात निसर्गाचा चमत्कार अनुभवण्याचा काळ समजला जातो. सुमारे महिनाभराच्या या ठरावित काळात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर आणि कळसूबाई या परिसरातील हजारों झाडांवर आणि वृक्षवेलींवर अचानक चमचमणारे हजारों, लाखोंच्या संख्येतील काजवे दिसू लागतात. हा सगळा प्रकार गुढकथेतील एखाद्या मायावी प्रकारासारखा भासावा असाच. अचानक समोर दिसणार्या या छोट्या-छोट्या जीवांमधून निघणारा इवलासा प्रकाश काही क्षणात झाडांवर लखलखाट करतो, तर दुसर्याच क्षणात अंधार. हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवणार्या कोणालाही जादुईच वाटावा.

गेल्या दशकभरात निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेला हा अनोखा प्रकार राज्यभर पोहोचल्याने दरवर्षी मे महिन्याच्या मध्यापासून प्रत्यक्ष मान्सून सुरु होईस्तोवर भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होवू लागली आहे. वनविभागानेही या भागातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळण्यासह आदिवासी भागाच्या अर्थकारणाला गती मिळावी म्हणून निसर्गाच्या या अविष्काराला व्यापक स्वरुप देताना दरवर्षी ठराविक कालावधीत ‘काजवा महोत्सव’ आयोजित करण्यास सुरुवात केली. त्याचा प्रचार-प्रसारही झाल्याने गेल्याकाही वर्षात मान्सूनपूर्व कालावधीत भंडारदरा परिसरातील पर्यटनात मोठी वाढ झाली आहे.

यावर्षीही वनविभागाने 23 मेपासून 15 जूनपर्यंत हा महोत्सव आयोजित केला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील उर्वरीत भागांसह अकोले तालुक्यातही सर्वदूर अवकाळी पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरात या पावसाला अधिक जोर असल्याने काजव्यांसाठी पोषक वातावरण तयार होवू शकलेले नाही. त्याचा परिणाम अपेक्षित कालावधी उलटूनही अद्याप या परिसरात कोठेही काजव्यांचे दर्शन घडलेले नाही. त्यातच सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा मुक्काम पुढील काही दिवस वाढण्यासह नैऋत्य मोसमी वार्यांनी तळकोकणात तळ ठोकल्याने भंडारदर्यांच्या परिसरात वेळेेपूर्वीच मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा काजव्यांसाठी आवश्यक वातावरण तयार होण्याची शक्यता धुसर झाली असून त्याचा फटका यंदाच्या महोत्सवावरही पडणार आहे.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते मान्सून सक्रिय होण्याच्या कालावधीत कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांचा खेळ रंगत असतो. येथील विशिष्ट वातावरणात जमिनीवर अथवा झाडाफुलांवर रेंगणार्या माद्यांना आकर्षित करण्यासाठी नर काजवे प्रकृतिक ऊर्जा निर्माण करतात व स्वतः प्रकाशित होवून माद्यांना खुणावत. या कालावधीत निरंतर चालणार्या या प्रक्रियेत हजारों, लाखों नर काजवे एकाचवेळी चमचमत असल्याने अभयारण्यातील बहुतेक झाडांवर जणू नभातील तारांगणच अवतरल्याचा आभास होतो. यावेळी मात्र पर्यटकांचा हिरमोड होण्याचीच अधिक शक्यता असून अद्यापपर्यंत या महोत्सवाचा शुभारंभ झालेला नाही.

